ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
एखादा माणूस शिक्षण घेतो, नोकरी करतो आणि आपले कर्तव्य म्हणून आयुष्य जगतो. पण काही माणसे त्यापलीकडे जातात. ते केवळ स्वतःसाठी जगत नाहीत, तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने प्रेरित होतात. श्री. संदीप ईश्वर पाटील सर हे अशाच प्रवृत्तीचे कार्य कुशल ,कृतिशील संवेदन शील असे शिक्षक.
त्यांचा प्रवास केवळ वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरता सीमित नाही. त्यांनी चित्रकला, काव्य, समाजकार्य आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम साधत हजारो विद्यार्थ्यांना दिशा दिली, गरजूंच्या हातात मदतीचा आधार दिला आणि समाजाला काहीतरी देण्याची मनोवृत्ती रुजवली तसेच अनेक लोकांना विद्यार्थ्यांना समाजाला समाजसेवेची प्रेरणा दिली.
*संघर्षाची पहाट : खान्देश पारोळा तालुक्यातील देवगाव ह्या खेडेगावातील प्रवास*
संदीप ईश्वर पाटील सरांचा प्रवास एका खेडेगावातील पडक्या घरातून सुरू झाला. लहानपणी सकाळी पाच वाजता उठून गुरं राखायची, त्यानंतर डोक्यावर टोपली घेऊन गल्लीगल्लीत फिरत भाजीपाला विकायचा. शाळा सुटल्यावर कधी शेतात मजुरी, तर कधी वडिलांसोबत रात्रीभर शेतात काम करायचं. आठ जणांचं कुटुंब, घरची हलाखीची परिस्थिती, तरीही सतत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला.कशीबशी दहावी पूर्ण केली आणि संभाजीनगर येथे उच्च शिक्षणासाठी चित्रकलेच्या माध्यमातून प्रवेश मिळविला. गावकडच्या शांत वातावरणातून शहरात आले तेव्हा मोठ्या इमारती, रहदारी पाहून मनात भीती होती. मराठी भाषा व्यवस्थित येत नव्हती, खान्देशी लहेजा होता. बालपण शेतीत गेले असल्याने शिक्षणापेक्षा शारीरिक कष्टच जास्त ओळखीचे होते. घरावर अफाट कर्ज होतं, एक मोठा भाऊ आणि चार लहान बहिणी होत्या आई आजाराने त्रस्त होती तरी देखील कुटुंबासाठी कणखर उभी राहत होती शेतीत पुरेसं उत्पन्न नव्हतं.
शिक्षण चालू असताना पार्ट-टाइम कामे केली – कधी दुकानात, कधी हॉटेलात, कधी पेंटर म्हणून. स्वतःच्या पायावर उभं राहताना आई-बाबांच्या पैशावर शिक्षण करणं आणि स्वतःच्या मेहनतीवर शिक्षण घेणं यातला फरक स्पष्ट जाणवला. शिक्षण चालू असताना आणि नोकरीच्या शोधात असताना लग्न झालं, जबाबदाऱ्या वाढल्या हळूहळू संसारातील तिढ निर्माण झाले अनेक कठीण प्रसंग निर्माण आलीत,तरीही मोठ्या प्रयत्नाने आणि नशिबाने नोकरी मिळाली.
*शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख*
श्री संदीप ईश्वर पाटील सरांनी फाउंडेशन, CTC, ATD, AM, GD Art, PSLM (Program on School Leadership Management), आणि BA (Politics) अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून शिक्षण घेतलं. शिक्षणाच्या सोपानावर चढत असताना त्यांनी कधीही आपल्या मूळ उद्दिष्टापासून नजर हटू दिली नाही – विद्यार्थ्यांना सृजनशीलतेची गोडी लावायची!
आज ते फातिमा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अंबरनाथ येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. १७ वर्षे सरकारी आणि ५ वर्षे खाजगी शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षण क्षेत्रात २२ वर्षाचा अनुभवातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध केलं आहे. एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन देत असताना, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेची ओळख करून दिली. एवढेच नव्हे कला आणि कविता च्या माध्यमातून शिक्षणाची मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून स्वतः स्वरचित कवितेतून मुलांना आकर्षित केले आणि चित्राच्या माध्यमाने अक्षराची ओळख आणि शिक्षणाची आवड निर्माण केली.
शब्दांमधून उमलणारी संवेदनशीलता
केवळ रंग आणि ब्रश पुरेसा नव्हता, म्हणून शब्दांमधूनही संवेदनशीलता उमटवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कविता ५० आणि लेख
५ विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले, १५ हून अधिक काव्य पुरस्कार, काव्यरत्न पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे अनेक पुरस्काराचे मानकरी झालेत.
त्यांची कविता केवळ शब्दांची जुळवाजुळव नव्हती, तर ती समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणारी होती. समाजातील दुःख, अन्याय, माणसातील करुणा, शिक्षणाची जनजागृती, व्यसनमुक्ती वर, आई वडिलांची महती, गुरुजनांची महती, समाजासाठी कर्तुत्व, निसर्गाची जाणीव – या सगळ्यांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे शब्दबद्ध केलं.
समाजासाठी झोकून देण्याची वृत्ती
एकदा का संवेदनशील मन निर्माण झालं, की ते केवळ पाहून स्वस्थ बसत नाही. संदीप ईश्वर पाटील सरांचंही तसंच झालं. त्यांनी समाजसेवेचं व्रत उचललं.
✔ बालाश्रम, वृद्धाश्रम, झोपडपट्ट्या, दुर्गम भाग,गावं, वाडी वस्ती ,जिल्हा परिषद शाळा – जिथे शिक्षण पोहोचायला हवं होतं, तिथे ते स्वतः पोहोचले.
✔ कधी समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, व्यक्ती विकास मार्गदर्शन, कधी चित्रकलेच्या माध्यमातून शिकवण, कधी कविता-वाचन, कधी अन्नदान – वेगवेगळ्या पद्धतीने समाजसेवा करीत आहेत.
✔ रद्दीत टाकलेली पुस्तकं, जुने कपडे, खेळणी, बॅग, शैक्षणिकदृष्ट्या शालेय साहित्य – त्यांनी लोकांकडून गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचवतात.
✔ विविध क्षेत्रातील व्यक्ती आपापल्या अडचणी संदीप सरांना सांगून संदीप सर त्यांना त्यांच्या संकटातून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतात. (कधी ज्येष्ठ नागरिकांसाठी, कधी कुणाची फसवणूक झालेली असते, कधी कौटुंबिक वाद, कधी कोणी मानसिक दबावात इत्यादी अनेक ).
प्रेरणा मिळाली आई-वडिलांकडून
"जिवंत माणसाला नमस्कार करत नाही आणि मेल्यानंतर नमस्कार काय कामाचा?
जिवंत माणसांना खाऊ घालत नाही आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान काय कामाचे?"
वडिलांच्या या वाक्याने त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. माणसाला मदतीची गरज असते त्याच्या हयातीत, मृत्यूनंतर नव्हे. म्हणून ते आता आणि इथेच विविध माणसांची अडचणीत मदत करतात.
*विविध विषयांवर व्याख्याने, मार्गदर्शक, परीक्षक म्हणून*
शिव व्याख्याते,भीम व्याख्याते , पर्यावरण संरक्षण ,सामाजिक बांधिलकी, एकत्रित कुटुंब, व्यसनमुक्ती, शेतकरी जीवन , सुंदर जीवन, सुरक्षा, आई बाप हेच देव असे अनेक विषयावर व्याख्याने झालेत.प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि कधी पालक सभेत मार्गदर्शन. विविध विषयांचे पर्यवेक्षक म्हणून ४० होऊन अधिक कार्य केले.
अखंड चालणारी वाटचाल
घराची परिस्थिती सुधारायची होती, बहिणींची लग्नं करायची होती, आई-वडिलांना आधार द्यायचा होता. स्वतःच्या घराचे चार भिंती स्वतःच्या व्हाव्यात पण हे करत असताना स्वतःपुरता विचार कधी त्यांच्या मनात आला नाही.
12 तास शाळेतील नोकरी करत मिळणाऱ्या पैशातून घर चालवायचं होतं. तीन बहिणींची लग्न, आई-वडिलांचे आजार, शेतीच कर्ज, किरायाचं घर, कपडे आणि खाण्याची टंचाई – या सगळ्या अडचणींशी लढत होते. अनेकदा आजारी पडले तरी उपचारासाठी पैसे नव्हते. चित्रपट पाहणे, पार्टीला जाणे, धार्मिक स्थळांना भेट देणे असले काहीही जीवनात नव्हते. त्यांच्यासाठी मंदिरच त्यांचे तीर्थक्षेत्र होते, आणि आई- वडिल हेच देव होते.
गावाकडे बहिणीच्या लग्नासाठी शेती गहाण ठेवली, चार लाखांचं कर्ज तेरावर गेलं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या, झोप मात्र अजूनही नव्हती. कारण त्यांच्यासारखे कित्येक लोक समाजात संघर्ष करत असतील, म्हणून त्यांच्या मनात नेहमी एकच विचार येतो – समाजासाठी काहीतरी करायला हवं. प्रत्येकाला मदतीचा हात द्यायला हवा, ज्यामुळे कुणालाही अशा कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागणार नाही.
६०-७० हून अधिक पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार ,जिल्हास्तरीय पुरस्कार ,गुणवंत शिक्षक पुरस्कार, समाजसेवक पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार ,कला तपस्वी पुरस्कार, कलारत्न पुरस्कार ,कला गौरव पुरस्कार अशा अनेक विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतून मिळाले असले, तरी संदीप ईश्वर पाटील सरांसाठी ती काही यशाची परिसीमा नाही. अजूनही रोज नवनवे विद्यार्थी भेटतात, नवी संकटं समोर येतात, नव्या गरजा निर्माण होतात – आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी त्यांचं ध्येय आजही तितकंच स्पष्ट आणि कणखर आहे.शिक्षक असणं ही फक्त नोकरी नाही, ती सामाजिक बांधिलकी आहे. आणि हीच बांधिलकी जोपासणाऱ्या संदीप सरांना मनःपूर्वक सलाम!
✍ *लेखन… रमेश मारुती पाटील कोल्हापूर*
*संस्थापक/अध्यक्ष – लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान, कोल्हापूर*
खुप छान साहेब
ReplyDelete