श्रीकांत शितोळेंवर कारवाईची
कांचन कुलकर्णींची मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणमधील वाडेघर परिसरात साडेतीन एकर जमिनीच्या व्यवहारावरून शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. विकासक श्रीकांत शितोळे यांनी जमिनीचा पूर्ण मोबदला न देता धनादेश दिले आणि त्यानंतर संबंधित जमीन अन्य व्यक्तीला विकल्याचा आरोप शेतकरी पिंट्या पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका तथा गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, शितोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेघर येथील साडेतीन एकर जमिनीचा व्यवहार २००९ मध्ये १ कोटी २० लाख रुपयांना झाल्याचे शेतकरी पिंट्या पाटील यांनी सांगितले. मात्र, या व्यवहारात पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मोबदल्यापोटी देण्यात आलेले धनादेश वटले नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर संबंधित जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
जमिनीचा चालू बाजारभावानुसार योग्य मोबदला मिळेपर्यंत जागेचा ताबा सोडणार नसल्याची भूमिका पाटील कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे या जमिनीच्या व्यवहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे कांचन कुलकर्णी यांनी सांगितले. संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकरी पाटील यांना त्यांच्या जमिनीच्या व्यवहारातील कथित थकित मोबदल्याबाबत न्याय मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments