Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या ३४ शाळांच्या विकासासाठी ५४.५९ कोटींच्या निधीची मागणी

 

महापौर ॲड.हर्षाली चौधरी यांचे शालेय       शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ३४ शाळांच्या पुनर्बांधणीसह विविध शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरांनी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीत ५९ प्राथमिक आणि दोन माध्यमिक अशा एकूण ६१ शाळा कार्यरत आहेत. या शाळांपैकी ३४ शाळांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शाळांच्या पुनर्बांधणीसह नवीन शाळांची उभारणी, शालेय इमारतींची दुरुस्ती, अतिरिक्त वर्गखोल्यांची निर्मिती आणि शाळांचे दर्जोन्नतीकरण करण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संगणक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा व्यवस्था, ग्रंथालये, फर्निचर आणि एसटीईएम  प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरणपूरक ‘ग्रीन स्कूल’ संकल्पना राबविण्यावरही भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये सौरऊर्जेवर आधारित सोलर रूफटॉप, स्मार्ट लायब्ररी, आधुनिक स्वच्छतागृहे, सुरक्षित शालेय स्वयंपाकगृहे आणि आधुनिक शालेय व्यवस्थापन प्रणालींचा समावेश असेल.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या धर्तीवर आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावावा, या उद्देशाने ५४.५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.




Post a Comment

0 Comments