Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

२५ वर्षे संत गाडगे महाराजांचा संदेश देणाऱ्या सागर तोडकर यांच्यावर उदरनिर्वाहासाठी चणे आणि अंडी विकण्याची वेळ

 

"केडीएमसीने स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करून निवारा व मानधन द्यावे"

...सामाजिक कार्यकर्ते-पत्रकार रमेश घरत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण | प्रतिनिधी

मिमिक्री व विनोदी कलाकार म्हणून कार्यरत असलेले तसेच गेल्या सुमारे २५ वर्षांपासून संत गाडगे महाराजांच्या विचारांचा आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे कलाकार सागर तोडकर यांच्यावर सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी चणे व अंडी विकण्याची वेळ आली आहे. त्यांच्या सामाजिक आणि स्वच्छता अभियानातील योगदानाची दखल घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्यांची ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमेश घरत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सागर तोडकर यांनी अनेक वर्षे संत गाडगे महाराजांच्या वेशभूषेत विविध ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन आणि विनोदी कलाविष्काराच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक संदेश देण्याचे काम केले. मात्र बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले असून सध्या कल्याणमधील मिलिंद नगर परिसरात चणे व अंडी विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सागर तोडकर यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीही हलाखीची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अनेक वर्षे स्वच्छता व सामाजिक जनजागृतीचे काम करणाऱ्या या कलाकाराला प्रशासनाने आधार देणे गरजेचे असल्याचे रमेश घरत यांनी म्हटले आहे.

केडीएमसीच्या स्वच्छता अभियानात त्यांना अधिकृतपणे ‘स्वच्छता दूत’ म्हणून सहभागी करून घेण्यात यावे, त्यांना नियमित मानधन देण्यात यावे तसेच राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देताना संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या सागर तोडकर यांच्यासारख्या कलाकारांच्या अनुभवाचा उपयोग प्रशासनाने करून घ्यावा, असेही रमेश घरत यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सामाजिक कार्यासाठी आयुष्याची अनेक वर्षे देणाऱ्या कलाकाराला संकटाच्या काळात प्रशासनाने मदतीचा हात देऊन त्याच्या कलेला आणि सामाजिक कार्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments