ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामातील महत्त्वाचा अडथळा अखेर दूर होण्यास सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलाच्या मार्गात बाधित होणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर करून रिक्त झालेली बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सोमवारी हाती घेतली. या कारवाईत म्हसोबा नगरमधील २६ आणि संतवाडीतील ३२, अशी एकूण ५८ बांधकामे निष्कासित करण्यात आली.
केडीएमसीच्या ‘फ’ प्रभाग कार्यक्षेत्रातील ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक या २४ मीटर रुंदीच्या रेल्वे समांतर रस्त्यावरील महालक्ष्मी इमारतीपर्यंतच्या १५ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामासाठी ही बांधकामे अडथळा ठरत होती. ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामासाठी बाधित रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करून जागा मोकळी करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले होते.
आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रसाद बोरकर आणि विराज लबडे यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘फ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि ‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी म्हसोबा चौक परिसरातील, तर सहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांनी संतवाडीतील बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.
“आज ५८ घरे निष्कासित करण्यात आली असून, उर्वरित बांधकामेही लवकरच काढण्यात येतील,” अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी दिली. उड्डाणपुलासाठी तसेच पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा मोकळी झाल्याने रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाच्या मार्गात बाधित होणाऱ्या आणखी काही रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचेही सांगण्यात येत आहे. या पुनर्वसनाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतल्यानंतर उर्वरित जागाही मोकळी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.
Post a Comment
0 Comments