गणेशनगरमधील अनधिकृत
दुकानांचे गाळे भुईसपाट
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभागाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी टिटवाळा पूर्वेतील गणेशनगर परिसरातील दोन अनधिकृत दुकानांच्या गाळ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली.
अ प्रभाग क्षेत्रातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी गणेशनगर परिसरातील दोन अनधिकृत दुकानांचे गाळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग क्षेत्र अधिकारी अनिता राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकातील कर्मचारी, पोलीस बंदोबस्त तसेच जेसीबीची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. दरम्यान, टिटवाळा परिसरात महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे. भविष्यातही अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments