रासरंगच्या आयोजनाचा निधी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना देणार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील ‘रासरंग दांडिया उत्सव-२०२६’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी करण्यात येणारा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना आमदार राजेश मोरे आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, शरद गंभीरराव, बंडू पाटील, सागर जेधे, संतोष चव्हाण, विवेक खामकर, प्रकाश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. मात्र, यंदा शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचा जल्लोष न करता मदतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रासरंगच्या आयोजनासाठी होणारा खर्च यंदा शेतकरी मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे.
कोणत्या भागातील आणि कोणत्या कुटुंबांना मदत करायची, तसेच मदतीचे स्वरूप काय असावे, याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. मदत थेट गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यावर भर राहणार असल्याचे यावेळी सांगितले. मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, यंदा रासरंगचा भव्य दांडिया उत्सव होणार नसला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाणार आहे. उत्सव दरवर्षी साजरे करता येतात; मात्र संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका या निर्णयातून व्यक्त करण्यात आली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments