Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामूहिक अत्याचार प्रकरणी पीडितेला संरक्षण देण्याची कांचन कुलकर्णी यांची मागणी

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील सामूहिक अत्याचाराच्या आरोपांच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील पीडित महिलेला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका तथा गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी या प्रकरणातील पीडित महिलेच्या जीवाला दोन्ही आरोपींकडून धोका असल्याची भीती व्यक्त करत कांचन कुलकर्णी यांनी तिला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पीडितेने १६ सप्टेंबर रोजी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तिला सोबत घेऊन पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

तर याप्रकरणी त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून कथित अत्याचार झाल्याचे सांगत तीन महिलांनी, तर बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांच्याकडून कथित अत्याचार झाल्याचे सांगत १५ महिलांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने महिलेला बापगाव येथील खासगी ठिकाणी नेऊन शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, आणखी काही महिला पुढे येण्यास इच्छुक आहेत; मात्र सध्या त्या भीतीमुळे समोर येत नाहीत. त्यामुळे संबंधित महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांच्या तक्रारींची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर कसे उपलब्ध आहे आणि त्याचा वापर कशाप्रकारे केला जात आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. 


Post a Comment

0 Comments