गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आनंदाचा सण आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक आणि सामूहिक स्वरूप देऊन तो एक राष्ट्रव्यापी जनजागृतीचा उत्सव बनवला. त्या काळी गणेश चतुर्थी प्रामुख्याने घराघरांमध्ये मर्यादित स्वरूपात आणि एका दिवसासाठी साजरी केली जायची. 
टिळकांनी हा सण सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या मूर्तींची स्थापना करून १० दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केली. ब्रिटीश सरकारने राजकीय सभा आणि एकत्र जमण्यावर बंदी घातली होती. या धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून त्यांच्यात राजकीय व राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करणे हा टिळकांचा मुख्य हेतू होता. या उत्सवाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माचे आणि स्तरांचे लोक एकत्र आले. गणेशोत्सवात देशभक्तीपर गीते, पोवाडे, कीर्तने, व्यायामाची प्रात्यक्षिके आणि प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केली जाऊ लागली. यातून लोकांमध्ये स्वातंत्र्याची आणि स्वदेशीची प्रेरणा जागृत केली गेली.टिळकांनीच सर्व सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींचे दहाव्या दिवशी एकत्र येऊन भव्य मिरवणुकीने विसर्जन करण्याची पद्धत रुजवली.
त्याकाळी एक गाव एक गणपती अशी प्रथा होती.हळूहळू या प्रथेत बदल घडत गेला आणि आता तर प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती आणू लागले. त्यामुळे एकीची भावना कुठे तरी थोडी कमी होत चालली दिसत आहे. गणेशोत्सवात मूर्ती लहान की मोठी यावरून सुद्धा चढाओढ लागलेली दिसते. यासाठी प्रत्येकाने लहान अगर मोठी मूर्ती न पाहता बाप्पाची मनोभावे पूजा कशी करता येईल अन् प्रत्येकाला या उत्सवाचा आनंद कसा घेता येईल याचा विचार केला पाहिजे. तरच आपण गणेशोत्सव साजरा केला याचे आत्मिक सुख प्रत्येकाला मिळेल आणि बापालाही आनंद होईल,कारण बाप्पा कशाचाच भुकेला नाही,तो फक्त वासाचा भुकेला आहे. आपण सगळे आनंदी तर बाप्पाही आनंदी हाच विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
बाप्पांचे आगमन होताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्रीगणेशाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या नावाखाली मंडळ वर्गणी गोळा करतात आणि त्याच्यातच डीजे लावून धिंगाणा केला जातो.गणेशोत्सव हा केवळ आनंद साजरा करण्याचा सण नसून आपल्या सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव करून देणारा उत्सवही आहे.
गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना आपण मोठ्या उत्साहाने सजावट करतो. आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजातील लोक एकत्र येतात आणि आपुलकी वाढते. मात्र उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
गणेशमूर्ती शक्यतो शाडू मातीची व नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर पर्यावरणाला हानीकारक वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. सजावटीसाठी कागद, कापड, फुलं, पाने आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा घरगुती विसर्जनाचा पर्याय स्वीकारल्यास जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते.
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्याऐवजी भक्तिगीते, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संयमाने आयोजित करावेत. तसेच रस्त्यावर कचरा न टाकता कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवाच्या काळात समाजोपयोगी उपक्रमही राबवता येतात. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, जनजागृतीपर कार्यक्रम अशा उपक्रमांमधून *सेवा हाच उत्सव* हा संदेश देता येतो.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे,परंतु तो पर्यावरणाच्या आणि समाजाच्या किंमतीवर साजरा होऊ नये. उत्सव आपला, पर्यावरणही आपलेच आणि जबाबदारीही आपलीच! म्हणून गणेशोत्सव साजरा करताना भक्तीबरोबर शिस्त, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांचा विचार करूया. प्रत्येकाने गणेशोत्सव ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे हे समजून गणेशोत्सव साजरा केला पाहिजे.
गणेशोत्सव हा कोकणातील श्रीगणेश भक्तांचा मोठा सण.कामधंदा,शिक्षण यानिमित्त शहरात उदरनिर्वाहासाठी गेलेली भक्त मंडळी या सणासाठी आपल्या गावी कोकणात येतात. वर्षभर बंद असणारी घरे बाप्पाच्या आगमनाने उघडली जातात.घर, अंगण सारा परिसर स्वच्छ केला जातो. पानाफुलांनी घरे सजवली जातात . अजूनही काही ठिकाणी आमच्या कोकणात गाईच्या शेणाने सारवण्याची पद्धत आहे.त्या सारवलेल्या जमिनीवर सुंदर अशी रांगोळीची नक्षी काढली जाते.दारात रांगोळ्या काढल्या जातात. गावात,कुटुंबात, भावकीत सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण होते. आमच्या कोकणात गणेशोत्सवात जाखडी नृत्य म्हणजेच बाल्या डान्स हा खूप प्रसिद्ध आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा नाच पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते. सर्व भक्तजन बापाची मनोभावे पूजा करून भजन,आरत्या गायन करतात. गणपती बाप्पा सोबतच येणाऱ्या गौराईचेही आनंदाने स्वागत केले जाते. तेरड्याच्या रोपाला खूप मोठे महत्त्व आहे. गौरीआवाहन,गौरीपूजन, आणि गौरी विसर्जन हे तीन दिवस सर्व महिला एकत्र मिळून आपले पारंपरिक खेळ खेळतात.कोकणातील महिलांचा पारंपारिक खेळ म्हणजे झिम्मा फुगडी,बसफुगडी, काटवट कणा, दिंडा मोडणे,किस बाई किस, कोंबडा खेळ यासारखे अनेक खेळ रात्रभर खेळले जातात.तर मग गणेशोत्सव हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक महत्त्वाचा सण आहे. म्हणून गणेशोत्सव ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया.
सौ.दीप्ती दिलीप यादव ....
पदवीधर शिक्षिका ता.खेड जि.रत्नागिरी
.jpg)






Post a Comment
0 Comments