तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती.
भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशासाठी ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसह विविध भाषांतील चित्रपट स्पर्धेत होते. या विविध आणि दर्जेदार चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना हा क्षण अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ‘गोंधळ’चा गाभा भारतीय मातीतला असला तरी त्याची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही मोठा सन्मान असून त्यासोबत राष्ट्रीय जबाबदारीही आहे. ऑस्करसाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध रोडमॅप तयार करण्यात आल्याचे डावखर यांनी सांगितले.
‘गोंधळ’ पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी असून जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या यशाचे श्रेय संपूर्ण कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांना देत डावखर यांनी प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच ‘गोंधळ’चा अनुभव घ्यावा आणि भारताच्या ऑस्कर प्रवासाचा भाग व्हावे, असे आवाहन केले आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments