४२७ ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य चळवळ प्रभावीपणे राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज, दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, गुणांकन, विविध उपक्रम तसेच निर्धारित कालावधीत करावयाच्या कामकाजाबाबत अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी “अभियान यशस्वी करण्यासाठी जीव ओतून काम करणे गरजेचे असून, ठराविक कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पूर्ण करावे. विविध विभागांनी समन्वयाने काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.
मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान ग्रामीण भागात आरोग्याची चळवळ म्हणून उभी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या कामकाजाचे आत्मपरीक्षण करून अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्याची गरज आहे. आजची कार्यशाळा नवीन बाबी शिकण्यासाठी आणि त्या गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी मोलाची आहे. ठाणे जिल्ह्याला विविध स्पर्धांमध्ये उच्च स्थानी ठेवण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे काम करावे. आशा, अंगणवाडी सेविका आणि सरपंच यांनी विशेष पुढाकार घ्यावा. कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत.”
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी दैनंदिन कामकाज अधिक परिणामकारक व उठावदार करण्यासाठी विविध अभियानांची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. गावपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घ्यावा. लसीकरण, गृहभेटी, पाणी गुणवत्ता तपासणी, गरोदर मातांची काळजी तसेच पाण्याचे स्रोत तपासणी यासारखी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, स्वच्छता ही सेवा, सेवा संकल्प तसेच ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांमध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. आरोग्य संपन्न गावाच्या निर्मितीसाठी विविध आरोग्य चाचण्या, घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक बाबींवर प्रभावीपणे काम करणे गरजेचे असून ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी अभियानांतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असून ४२७ ग्रामपंचायतींनी आरोग्य संपन्न गाव निर्माण करण्यासाठी जोमाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सूक्ष्म नियोजन करून प्रचार-प्रसिद्धीच्या माध्यमातून अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी, संत गाडगेबाबा व भगवान धन्वंतरि यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानांतर्गत ३१ मार्चपर्यंत निर्धारित कामकाज पूर्ण करावयाचे असून, जिल्ह्यात आरोग्याची चळवळ प्रभावीपणे राबविण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, गरज व अभियानाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी अभियानातील कामकाजाची पद्धत, गुणांकन, राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच पारितोषिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक देविदास महाजन, गटविकास अधिकारी, सरपंच, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरुलता धानके यांनी केले.
.jpg)





Post a Comment
0 Comments