Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

करचोंडे येथील तरुण शेतकऱ्यांने ओसाड माळरानावर फुलवले वृक्षांचे नंदनवन

पाणीटंचाई असतानाही डोक्यावरून पाणी वाहून शेकडो झाडे जगवली 

शासनाच्या मदतीची अपेक्षा

               ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड वार्ताहर 

मुरबाड तालुक्यातील करचोंडे गावातील अनंत कृष्णा पवार  या एका तरुण शेतकरी ने आपल्या जिद्द, मेहनत आणि पर्यावरणप्रेमाच्या जोरावर ओसाड माळरानाचे अक्षरशः हिरवाईने नटलेले नंदनवन केले आहे. २०१७ पासून कोणतीही शासकीय मदत किंवा आर्थिक पाठबळ नसताना या दाम्पत्याने पडीक जमिनीवर शेकडो वृक्षांची लागवड करून ते जगवण्याचे काम केले आहे.

एकीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असताना, या तरुण शेतकऱ्याने झाडांना पाणी मिळावे यासाठी डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून नेले. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असतानाही झाडे सुकू नयेत म्हणून दिवस-रात्र मेहनत घेत त्यांनी अनेक वर्षे वृक्षांचे संगोपन केले. त्यामुळे आज एकेकाळी ओसाड दिसणाऱ्या माळरानावर विविध प्रकारच्या झाडांची हिरवाई पाहायला मिळत आहे.

या वृक्षनंदनवनात आंबा, फणस, चिकू, पेरू, मोह, सहाब, लिंबू, शेवगा, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळझाडे व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी त्यांचे नियमित संगोपन करून शेकडो झाडे जगविण्याचे काम या दाम्पत्याने केले आहे.


‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाला केवळ घोषणेपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचे काम परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पडीक जमिनीचा योग्य वापर कसा करता येतो, याचेही हे उत्तम उदाहरण आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्याच उद्देशाला करचोंडे येथील या तरुण शेतकऱ्याने आपल्या प्रत्यक्ष कृतीतून हातभार लावला आहे.

कृषी विभागाने दखल घेण्याची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही शासकीय मदत न घेता स्वतःच्या मेहनतीवर शेकडो झाडे जगविणाऱ्या या तरुण शेतकऱ्याच्या कार्याची कृषी विभागाने तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, फळबाग लागवड तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ या शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता पर्यावरण संवर्धनाच्या ध्येयाने झपाटून काम करणाऱ्या या तरुण दाम्पत्याने २०१७ पासून जिवापाड मेहनत घेऊन ओसाड माळरानाचे हिरवाईने भरलेले नंदनवन उभे केले आहे. विशेष बाब म्हणजे शेततळ्याच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये साठवलेले पाणी पावसाळा येईपर्यंत ते साठवून वृक्षांना पाणी देण्याचे काम करत आहे त्यासाठी तब्बळ 4 शेततळ्यांची निर्मिती केली आहे त्यातच छोटे छोटे टाक्या बांधून ठिबक सिंचन पद्धत तयार केली आहे या ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून आज पर्यंत ही शेकडो झाडे जगवली आहेत त्यांच्या या कार्याला शासनाने प्रोत्साहन दिल्यास परिसरातील इतर तरुणांनाही वृक्षलागवड व संवर्धनासाठी प्रेरणा मिळू शकते.

ओसाड माळरानावर हिरवाई फुलवणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा आदर्श प्रशासनाने जपला आणि त्याला योग्य सहकार्य केले, तर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश मुरबाडच्या ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होईल.

Post a Comment

0 Comments