Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एसआयआर च्या अतिरिक्त कामाची दखल घ्यावी...

शिक्षक-बीएलओंना एक वेतनवाढ अन् भरपाई रजा द्या
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण  मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष क्षेत्रीय काम करणाऱ्या शिक्षक-बीएलओंना शासनाने मंजूर केलेल्या ₹6,000 एकवेळ विशेष मानधनाबरोबरच एक अतिरिक्त वेतनवाढ  देण्यात यावी. तसेच रविवार, सार्वजनिक व शासकीय सुट्टीच्या दिवशी केलेल्या एसआयआर कामासाठी भरपाई रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस आणि कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.

एसआयआर प्रक्रियेत मतदारांच्या घरोघरी भेटी, 
गणनेचे नमुन्यांचे  वितरण व संकलन, मतदारांशी संपर्क, माहिती संकलन, पडताळणी, अपूर्ण अथवा चुकीची माहिती दुरुस्ती आणि अन्य क्षेत्रीय जबाबदाऱ्या बीएलओंना पार पाडाव्या लागत आहेत. हे काम त्यांच्या नियमित शैक्षणिक जबाबदाऱ्यांसोबतच सुरू असल्याने शिक्षक-बीएलओंवर अतिरिक्त वेळ, श्रम, प्रवास आणि आर्थिक खर्चाचा भार पडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार बीएलओंच्या नियमित मानधनात वाढ करण्यात आली असली, तरी एसआयआर मधील अतिरिक्त कामाचे स्वरूप आणि वाढलेला कार्यभार लक्षात घेता स्वतंत्र सेवा-मान्यता आवश्यक आहे, असा दावा संघटनेने केला आहे.

विशेषतः मोठ्या प्रमाणात गणनेच्या नमुन्यांचे किंवा अतिरिक्त क्षेत्रीय काम सोपविण्यात आलेल्या बीएलओच्या कामाचे स्वतंत्र मूल्यमापन करून त्यांना अतिरिक्त आर्थिक अथवा सेवा-लाभ द्यावा. एसआयआरसाठी केलेल्या प्रवास व क्षेत्रीय खर्चाची स्वतंत्र प्रतिपूर्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिक्षक-बिएलओच्या बाबतीत महाराष्ट्र एमईपीएस  नियम , 1981 मधील Rule 16 च्या अनुषंगाने सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामासाठी भरपाई रजेबाबत स्पष्ट आदेश काढावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

“₹6,000 चे विशेष मानधन स्वागतार्ह आहे; मात्र शिक्षक-बीएलओच्या अतिरिक्त श्रमाला कायमस्वरूपी सेवा-लाभाची जोड मिळणे आवश्यक आहे. एक वेतनवाढ आणि सुट्टीच्या दिवशीच्या कामासाठी भरपाई रजा हा शिक्षकांच्या अतिरिक्त योगदानाचा योग्य सन्मान ठरेल,” असे सुधीर घागस यांनी सांगितले.

“नियमित अध्यापनासोबत एसआयआरचे क्षेत्रीय काम करणाऱ्या शिक्षक-बीएलओ वर दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या अतिरिक्त कामाची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांना योग्य सेवा-मान्यता, प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती आणि भरपाई रजा देण्याचे स्पष्ट आदेश शासनाने तातडीने द्यावेत,” अशी मागणी थॉमस शिनगारे यांनी केली.




Post a Comment

0 Comments