ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सणासुदीच्या काळात वेतनात कपात केल्याच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या केडीएमटीच्या कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर निदर्शने करत बंगल्याच्या प्रवेशद्वाराला राखी बांधून प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले.
आंदोलनादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांचा मुखवटा परिधान करून सांकेतिक निषेधही केला. सणासुदीच्या दिवसांत कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलकांनी कपात करण्यात आलेले वेतन तातडीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली. मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराला इशारा देताना सांगितले की, कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने खात्यात जमा न केल्यास संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या अनोख्या आंदोलनामुळे आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरात काही काळ राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले होते. सणासुदीच्या काळात वेतनात करण्यात आलेली कपात कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.
.jpg)

Post a Comment
0 Comments