हॉटेल मालकासह वेटर आणि पाच ग्राहकांवर गुन्हा
८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
खडकपाडा सर्कल परिसरातील रॉक माउंट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या रॉक माउंट लाउंजवर बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी लाउंजमध्ये ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत जळता कोळसा आणि तंबाखूजन्य पदार्थांसह हुक्क्याचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाउंजमध्ये धूर बाहेर जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने संपूर्ण हॉलमध्ये धूर पसरलेला होता. तसेच हॉलमध्ये ‘स्मोकिंग झोन’बाबत कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला नसल्याचेही आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एका युवकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय शिंदे असून आपण संबंधित हुक्का पार्लरचा मालक असल्याचे सांगितले. हुक्का पार्लर चालविण्यासाठी आवश्यक परवाना त्याच्याकडे नसल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक विजय शिंदे, एक वेटर तसेच हुक्का सेवन करणाऱ्या पाच ग्राहकांविरोधात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्यासह बीएनएसच्या संबंधित कलमांतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवरची पाकिटे असा एकूण ८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments