Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मेट्रोसोबत फ्लायओव्हरही जलदगतीने पूर्ण करा फ्लायओव्हरची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक लक्षात घेता मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच रस्ते वाहतुकीसाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो १२ च्या डबल डेकर रचनेखाली प्रस्तावित फ्लायओव्हरची कामे जलदगतीने मार्गी लावून नागरिकांना या मार्गांचा वाहतुकीसाठी लवकरात लवकर वापर करता यावा, असे स्पष्ट निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
 मेट्रोच्या खालून जाणारे हे फ्लायओव्हर कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना एक नवा आणि अधिक वेगवान पर्याय उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना अधिक गती देण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त (१) पी. वेलारासू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, भूसंपादन, प्रशासकीय मान्यता, विविध परवानग्या, तांत्रिक अडचणी तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी आमदार राजेश मोरे, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ यांच्यासह विविध महापालिका व प्रशासकीय संस्थांचे अधिकारी, अभियंते तसेच शिवसेनेचे स्थानिक महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments