Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केडीएमसी हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

                 

                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

  प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी ठाणे जिल्ह्यासाठी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.


प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात ३ जुलै ते ५ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट, तर ४ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, काही ठिकाणी पाणी साचणे तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संभाव्य परिस्थितीमुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ही सुट्टी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, सीआयई आदी सर्व शिक्षण मंडळांच्या तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि महाविद्यालयांना लागू राहणार आहे.

तसेच शाळा व महाविद्यालय प्रशासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत. हे आदेश आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी जारी केला आहे.

Post a Comment

0 Comments