Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत केडीएमसीचे आवाहन आणि उपाययोजना

 


                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असून काही उपाययोजना करण्याचे देखील आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच जोरदार वारे आणि अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारपासून  महानगरपालिका क्षेत्रात झाडे पडण्याचे एकूण ३० कॉल अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाले असून त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. बुधवारी लालचौकी येथे अतिधोकादायक झाड रात्रीच्या वेळी उद्यान विभाग व अग्निशमन विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करुन काढले आहे.
पावसाळयात घडणाऱ्या दुर्घटनांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. रस्त्यावरील पडलेली झाडे आणि फांद्या हटवून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अग्निशामक सतर्क आहे. झाडे कोसळल्याची घटना घडल्यास तात्काळ मदतीसाठी महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, तसेच अग्निशमन विभागाकडे सुचना करावी. सदर विभाग २४ तास कार्यान्वीत आहेत.
वादळी वारा आणि मुसळधार पाऊस सुरू असताना मोठ्या झाडांखाली किंवा कमकुवत इमारतींच्या आडोशाला उभे राहू नका. झाडांच्या खाली आपली वाहने (दुचाकी/चारचाकी) पार्क करणे टाळावे. आपल्या परिसरात एखादे झाड धोकादायक स्थितीत असल्यास किंवा झुकलेले दिसल्यास त्याची माहिती तात्काळ नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, तसेच अग्निशमन व आर्णीबाणी सेवा विभागाला द्यावी. खासगी सोसायटी किंवा मालकीच्या जागेतील झाडांची सुरक्षा राखण्याची जबाबदारी संबंधित जागा मालकांची असून, त्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि गरज भासल्यास पालिकेच्या उद्यान विभागाची मदत घ्यावी असे आवाहन नागरीकांना करण्यात आले असल्याची माहिती नामदेव चौधरी यांनी दिली.
महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष ०२५१-२२११८६६, ०२५१-२२११३७३, १८००-२३३-००४५, १८००-२३३-७३८३, १८००-२३३-४३९२.
अग्निशमन व आणिबाणी सेवा मुख्यालय ०२५१-२३१५१०१, ०२५१-२३१०१५५


Post a Comment

0 Comments