वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीला पूर आला असून टिटवाळा–फळेगाव मार्गावरील रुंदे पूल तसेच वाळकस–वेहळे पूल गुरुवारी पहाटेपासून पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून फळेगाव परिसरातील १० हून अधिक गावांचा टिटवाळा व मुरबाडशी संपर्क तुटला आहे. तहसीलदार विकास गरुडकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी नागरिकांना दानबाव–खडवली मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याचे आवाहन केले असून हा मार्ग पूर्णपणे सुरू असल्याचे सांगितले.
गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजता रुंदे पूल, तर सकाळी ६ वाजल्यापासून वाळकस–वेहळे पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी वाहने अडकली. पूल लवकर मोकळा होण्याची शक्यता नसल्याने अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. रुंदे पूल बंद झाल्याने फळेगाव परिसरातील नोकरदार, दूध व भाजीपाला विक्रेते तसेच टिटवाळ्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी सकाळीच टिटवाळ्याकडे प्रस्थान केले होते.
कोणताही वाहनचालक धाडस करून पाण्यातून पूल ओलांडू नये यासाठी रुंदे पुलाच्या दोन्ही टोकांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाने नागरिकांना जीव धोक्यात घालू नये आणि अधिकृत पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, रायते येथील उल्हास नदीवरील नव्या १०० फूट उंच पुलामुळे कल्याण–मुरबाड–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टिटवाळा–फळेगाव मार्गावर नवीन उंच पुलाचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर पुरामुळे होणारी वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments