Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नातेसंबंध जपण्याचा प्रभावी संदेश देणारा 'मधली भिंत' लघुपट प्रदर्शित

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संपत्ती, पैसा, घर, जमीन, अहंकार आणि वैयक्तिक स्वार्थ यांसारख्या कारणांमुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. अशा काळात नात्यांचे महत्त्व अधोरेखित करून समाजाला सकारात्मक संदेश देणारा आर्या फिल्म प्रस्तुत 'मधली भिंत' हा लघुपट नुकताच कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व कलाकार भिकू बारस्कर होते. यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "आज नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या भिंती दूर करण्यासाठी अशा कलाकृतींची नितांत गरज आहे. लेखक, दिग्दर्शक अजय पाटील यांनी 'मधली भिंत' या लघुपटातून नात्यांचे महत्त्व अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक गणेश भाने, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य शिवाजी शिंदे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण शाखा अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी कल्याण शाखा अध्यक्षा सुजाता डांगे, अभिनेते किरण डांगे तसेच साहित्यिक प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात लेखक, दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितले की, "'मधली भिंत' हा केवळ मनोरंजन करणारा लघुपट नसून नातेसंबंध जपण्याचा, कुटुंब एकत्र ठेवण्याचा आणि सकारात्मक विचारातून आनंदी जीवन जगण्याचा संदेश देणारा सामाजिक आशय असलेला लघुपट आहे. ३१ मिनिटांचा हा लघुपट यूट्यूबवर उपलब्ध असून समाजातील प्रत्येकाने तो अवश्य पाहावा.

 एलईडी स्क्रीनवर 'मधली भिंत' या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. लघुपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत हा लघुपट आजच्या प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक नात्यासाठी डोळ्यात अंजन घालणारा असल्याचे सांगितले. तसेच या कथानकावर आधारित पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
'मधली भिंत' हा लघुपट आर्या फिल्म प्रस्तुत असून निर्माते अजय यादव व राकेश यादव आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय पाटील यांचे आहे. संतोष शिंदे (छायांकन व संकलन), अनिल शहाकर (गीत), मिलिंद मोरे (गायन), विनोद बी. (पार्श्वसंगीत) आणि सोहम कोचरेकर (रंगभूषा) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. लघुपटात मेघन गुप्ते, श्रीरंग दाते, प्रीती बोरकर, डॉ. प्रदीप सरोदे, उज्वला कोठावदे, प्रियांका डांगे, जीवन मढवी, अजय पाटील, विनया घुगरे आणि पुष्पा थोरात यांनी प्रभावी अभिनय साकारला आहे.


Post a Comment

0 Comments