Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नव्या अभ्यासक्रमासाठी ठाणे जिल्हयातील शिक्षक सज्ज

ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

यंदा इयत्ता सहाव्या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम आला आहे. त्याचे अध्यापन कसे करावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना 'अपडेट' करण्यासाठी जिल्हास्तरीय सुलभक सज्ज ठेवण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण कल्याण येथील गजानन विद्यालयात दि. ०१ ते ०४ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० हे २१ व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे. सर्वांना सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच स्तंभावर, तसेच सांविधानिक मूल्यांवर आधारित हे शिक्षण धोरण आहे. संविधानाला अभिप्रेत असलेले सहजसोपे, गुणवत्तापूर्ण शिक्षण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे, यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण, तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ यातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे, महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक गरजांचा संदर्भ लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण तयार करण्यात आला आहे.  

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार टप्प्या टप्प्याने नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा इयत्ता सहावीसाठी नवा अभ्यासक्रम आणला गेला आहे. त्यामुळे इयत्ता सहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांना त्यासाठी तयार केले जाणार आहे. जिल्ह्यात अशा शिक्षकांची संख्या मोठी असल्याने सुलभकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य स्तरीय सुलभक कल्याण येथे तालुकास्तरीय सुलभकांना प्रशिक्षित करीत आहेत. मराठी माध्यम व उर्दू माध्यम अशा दोन वर्गात हे प्रशिक्षण सुरू आहे. 

सुलभक शिक्षकांना आधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षित केले गेले आहे. लोणावळा येथे २२ ते २५ जून या कालावधीत त्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर ते जिल्ह्यास्तरीय सुलभकांना दि. ०१ ते ०४ जुलै या कालावधीत प्रशिक्षण देत आहेत. या सुलभकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शिक्षक डॉ. दिनानाथ पाटील, भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली; श्री. शिवाजी गोतरणे, जि. प. शाळा, अंबर्जे, सौ. दिपाली पाटील, आरटीपी विद्यालय, दावडी, श्री. निवृत्ती खराटे, टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या शिक्षकांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी डायटचे प्राचार्य डॉ. संजय वाघ यांनी सर्व सुलभक व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कल्याण डोंबिवली महानगर पालिकाचे प्रशासकीय अधिकारी मा. श्री भरत बोरनारे सर यांनी शुभ संदेश दिला व डायटच्या अधिव्याख्याता डॉ. प्रभा खरटमोल मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले. या सर्व शिक्षकांना प्राचार्य डॉ. संजय वाघ सरांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments