Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुसळधार पावसात उघड्या वीजतारेने घेतला महिलेचा जीव

 

दोन लहान मुलांच्या आईचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू               

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात मुसळधार पावसादरम्यान रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजतारेच्या संपर्कात आल्याने ३४ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन लहान मुलांसाठी खाण्याचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.
मृत महिलेची ओळख शशी राहुल चक्र (वय ३४) अशी आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी तुटलेली वीजवाहिनी पाण्यात पडल्याने पाण्यात विद्युतप्रवाह पसरला होता. शशी चक्र या पाण्यातून जात असताना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचे पती राहुल चक्र यांनी आरोप केला की, अपघातानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये महावितरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजतारेमुळे हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments