Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुसळधार पावसातही विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद;


          १६०० विद्यार्थ्यांची उपस्थिती

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
मुसळधार पावसाचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या उत्साहावर झाला नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने बुधवारी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित 'विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्यास' तब्बल १६०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. विविध शाळांतील शिक्षकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या मेळाव्यात प्रख्यात व्याख्याते प्रा. यजुर्वेंद्र  महाजन (जळगाव) यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, करिअरचे पर्याय आणि भविष्यातील नियोजन याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहिती असलेली मार्गदर्शक पुस्तिकाही वितरित करण्यात आली.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक पुस्तिका, फ्रुटी, वडापाव आणि बिसलेरी पाण्याची बाटली देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक दिशा आणि करिअरविषयक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.


यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरवही करण्यात आला.  श्रुती संतोष भोईर यांनी पहिल्याच प्रयत्नात कठीण समजली जाणारी सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. प्रशांत मोरे यांच्या "कबीराचे देणे" या काव्यसंग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय डॉ. नरेश चंद्रा, माजी कुलगुरू, माजी प्राचार्य आणि बिर्ला महाविद्यालयाचे संचालक यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

 मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा करिअर मार्गदर्शनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली जागरूकता आणि उत्सुकता दर्शवणारा असल्याचे आयोजकांनी सांगितले.  या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  शिवसेना उपनेते विजय साळवी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments