ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "मिशन हरित केडीएमसी" या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज सोमवारी मांडा (प.), C&D वेस्ट प्लांट येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महापौर ॲड. हर्षली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, स्थानिक नगरसेवक बंदेश जाधव, नगरसेविका उपेक्षा भोईर, तसेच वृक्ष प्राधिकरण सदस्या शीतल मंढारी, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी आणि परिसरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ आणि भावी पिढ्यांना निरोगी व स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच वृक्षसंवर्धनाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महानगरपालिकेमार्फत "मिशन हरित केडीएमसी" अंतर्गत आगामी काळातही विविध ठिकाणी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
.jpg)

Post a Comment
0 Comments