सध्या आषाढात टिपटिप पाऊस बरसतो आहे.
मुंबई की बरसात का क्या है ऐतबार ? .......सारा पैसे का प्यार!
पाऊस कसा येतो?आला पाऊस, आला पाऊस अशी हाळी देत मेघ ढोल वाजवू लागतात. वीज फ्लॅश मारून ,फोटो काढून पावसाचे स्वागत करते. लहान मुलं आजीजवळ होड्या बनवायला पूर्वी बसत. हल्ली काही गेम खेळत बसतात. छत्र्या, रेनकोट कपाटातून बाहेर येऊन आकाशाकडे आशेने बघू लागतात. वर्षा ऋतूचे चीफ गेस्ट, पाऊस साहेब हजर झाले, हजर झाले. लोक असा विचार करतात यावर्षी तर काय पाऊस जरा जास्तच वाट बघायला लावतोय. आता तर म्हणे जुन मध्ये पडणार आहे. पाऊस पडो अथवा न पडो त्याला कायम चर्चेचा विषय बनून चर्चा करवायला आवडतं. गॉसीप करायला आपला जवळचा लाडका मित्र असल्यासारखा आणि तरी व्हीआयपी असल्यासारखा पाऊस भाव मात्र खात असतो.
खरं सांगायचं तर तो मित्र एक लहरी खटलं आहे. वळलं तर सूत नाही तर भूत. राग राग केला ना, तरी पावसाची आपण वाट बघतच असतो. वाट बघून कंटाळा आला की, तो आला म्हणतो. नंतर अनुनय विनय केल्यावर तरी गोडी गुलाबीत राहील तर ठीक, नीट वागेल तर ठीक, पण छे,लहरी वागतो. माझी बाग,शरीराची काहिली, शेतकरी बाबाची शेती वाट बघते. तेव्हा खडूस पाऊस येत नाही आणि नंतर कंटाळा आला, की आता जा रे बाबा सांगावं लागतं.
पावसाची आपली मैत्री फॉर एव्हर इन रिलेशनशिप असते. पण तो बेवफा होतो आणि त्रास पण देतो. कधी येतच नाही ,कधी घोस्ट होऊन जातो. कधी अबोला देऊन छळतो? कधी अवेळी येतो.
आला पहिला पाऊस व शिंपडली भुई सारी,
धरित्रीचा परिमल माझे मन गेले भरी
आला पाऊस आला सरीवर सरी,
शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी
आला पाऊस पोर निघाली भिजत दारी,
चिल्ला या मारत आला पाऊस,
आला पाऊस गडगडाट करीत
धडधड करी छाती ,पोर दडली घरात,
आला पाऊस पाऊस,
तुझ्या डोळ्यातले आस,
देवा तुझा रे आरास ,जीवा तुझी रे मिरास!
-बहिणाबाई.
हवा असलेला पाऊस आला की, शेत जमिनीला लाली आली म्हणतात. तिच्या अंगावरच्या दुभंग म्हणजे भेगा बुजू लागतात. चातक आतुरलेला असतो, पेरणी खोळंबलेली असते. पेरते व्हा सांगणारी पक्षिण,विचारत असते कधी येणार तो?
माईलीच्या दुधापरी आले तुषार तुषार भुकेजल्यात आणि तोंड पसरी शिवार,
तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ,
भरारतो रान वारा तसा झाडा झुडपात!
हिरवी पृथ्वी, मखमली गालीचे,
रेशमी पाऊस मन खुश होते.
पेरणी पेरणी अवघ्या जगाची कारणी
देवाची चरणी, कोटी पोटाची भरणी!
पेरणी पेरणी देवा तुझी रे करणी,
देवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी
पेरणी पेरणी आभाळात गडबड,
मेघा बरस बरस माझ्या उरी धडधड पेरणी पेरणी आला धरतीचा वास,
वाढे पेरणी शेतकऱ्या तुझी आस !(संग्रहित)?
चला पाऊस सुरू झाला. लव... हेट.. रिलेशनशिप असलेला ,हवासा.... नकोसा असा हा पाऊस असतो. फक्त पाऊस आणि मी, आम्ही दोघं! छत्री आणली नाही किंवा आणली तरी तो पाऊस छत्रीला जुमानत नसतो.
पाऊस खुळा किती पाऊस खुळा,
टपटपून अंगावरी हसावी फुला!
निसर्ग त्याच्या मिठीने खुश करतो. सहलीला न जाता आले तरी खिडकीतून दिसणारा हा पाऊस कूल करतो. यात्रेला वारीला जमल नाही तरी तिथे न जाता तो मनाला आध्यात्मिक करतो आणि माहेरी न जाता माहेरचा सांगावा आणतो.
आपल्या आत्म्याच्या मुळापाशी कोसळून आपली मूळ ओली करतो.
पाऊस आला भिजून घ्या,
थोडा मातीचा गंध घ्या,
थोडा मोराचा छंद घ्या,
उरात भरून आनंद घ्या,
आलाय पाऊस नाचून घ्या .ऊन रेंगाळते आहे बघा. या वर्षी वाट बघायला लागु नये. आजच टिपटिपीत भिजून घ्या.
**
.jpg)






Post a Comment
0 Comments