ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते - पुलांच्या
कामांबाबत आढावा बैठक घेण्यासाठी
निवेदन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, रस्ते तसेच उड्डाणपुलांच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आढावा बैठक घेण्याची मागणी भाजपचे भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नरेंद्र पवार यांनी रविवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत विविध महत्त्वाच्या प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विशेष आढावा बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
या भेटीवेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विलासराव काहाळे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश काहाळे, ॲड.परागराव काहाळे, अमोल बावणे, किरण शिखरे, नितीन पाटील, पारस भागडे, अथर्व पिंगळे, शुभम हिवसे, निलेश गुप्ता हेदेखील उपस्थित होते.
त्यासोबतच भिवंडी–वाडा–मनोर महामार्गाचे काम, मुंबई–नाशिक महामार्गाचे रखडलेले काम, इंदापूर–माणगाव बायपास, माणगाव शहरातून जाणाऱ्या अरुंद राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण यांसह मुंबई–गोवा महामार्गावरील अपूर्ण उड्डाणपूल - बायपासची कामे तातडीने पूर्ण करण्याकडेही पवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. इतकेच नाही तर या सर्व प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राज्य शासन आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची आग्रही विनंतीही नरेंद्र पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाल्यानंतर कोकण आणि ठाणे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळून नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास नरेंद्र पवार यांनी या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments