Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पापा की परी म्हणतात तिला !

                       ब्लॅक अँड व्हाईट विशेष

 प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी परीच असते. बाहुली  असते. घरची लक्ष्मी आणि  सौख्याचा प्रकाश देणारी पणती असते . तिला शिकविली तर पाहिजेच पण शालेय शिक्षणा बरोबरीने तिला योग्य वेळी योग्य संस्कारांचे पाठ शिकविणे सुध्दा तितकेच गरजेचे आहे. आपल्या समाजामध्ये दररोज ज्या भयानक घटना  घडत आहेत  त्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी  अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर कधी  ऐन तारूण्यात  युवकाने  अथवा युवतीने केलेली आत्महत्या . हल्ली तर घटस्फ़ोट  नावाच्या  राक्षसाने नुसता थैमान घातला आहे. आई वडिलांच्या  पसंतीस होकार देत लग्नाला  तयार व्हायचे दोन चार महिन्यांचा संसार थाटायचा  आणि तो फुलण्या अगोदरच घटस्फ़ोट द्यायचा.. मग  याला जबाबदार कोण ? यांवरती विश्लेषण देत बसण्यासाठी  समाज तयारीतच असतो. लव्ह मॅरेज किंवा लिव ईन रिलेशनशिप  हे सर्व आता समाज मान्य होत आहे. 

आपली मुले सुशिक्षित होत आहेत मुलगी सुध्दा मुलाला लाजवेल असा दणदणीत पगाराचा आकडा सांगते. हे सर्व खूप खूप कौतुकास्पद आहे .पण शिक्षण, नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने आजची पिढी घरापासून खूप दूर राहत आहे. मुलामुलींना आधाराची गरज आहे म्हणून मैत्री होणे सर्वसामान्य बाब असली तरिही  त्या मैत्रीच्या मर्यादा पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या आवडीचा जोडीदार निवडून तोच माझा जीवनसाथी होणार हे बहुदा मुलामुलींनी ठरवलेलेच असते. केवळ आजही गाव ,भावकी समाज याचा विचार करणारी वडीलधारी मंडळी  किमान प्रतिष्ठा सांभाळावी या हेतूने एक दोन तरी स्थळे घरापर्यंत यावीत या हेतूने कांदेपोहेचे नियोजन करतात. जर आपण सुशिक्षित आहोत व  मुलामुलींनी घेतलेले निर्णय जाणकार पालक म्हणून आपणांस मान्य असतील तर  इतर अनावश्यक  गोष्टीमधून वेळ व पैसा वाया घालविणे गैर आहे..आपली मुले योग्य निर्णय घेतील हा आत्मविश्वास येण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे योग्य पालनपोषण होणे गरजेचे आहे. मुलामुलींना योग्य संस्कार देण्यासाठी योग्य वेळी त्यांना वेळ दिलाच पाहिजे. पूर्वी आई व आज्जी मुलींच्या केसांना तेल  लावून वेणी घालत असायच्या आता  एकतर मुली डोक्यावरील विरळ केसांना तेल लावूनच घेत नाहीत शिवाय  प्रत्येक घरात आज्जी असेलच असे नाही.. तो एक मूलभूत संस्कार होता. तेलाने मसाज करित करित चार चांगल्या व स्त्रीच्या आरोग्यासाठी  महत्वाच्या गुजगोष्टी आई कानात सांगायची. मुलामुलींना बारीकसारीक गोष्टी विचारून मन मोकळे करायला भाग पाडायची . आता या अलिकडच्या काळात सर्वत्र प्रगतीचे वारे वाहू लागले आहे. घरात दहा माणसे असली तर दहा फोन हवेत. ज्याच्या त्याच्या जिवनाची स्वतंत्र अशी चौकट. कोणालाही कोणाबद्दल जिव्हाळा राहिलेला नाही. फक्त आणि फक्त दिखावा..स्टेटस व फाॅलोअर्स.. अहो बघेल तिकडे रिल स्टार . म्हणजे अंगात कोणतीही कला नसताना , कौशल्य नसताना , भविष्याचे संकल्प नसताना , आर्थिक नियोजन नसताना  कित्येक युवक व युवती दोन चार रिल्स  बघून एकमेकांवरती फिदा होतात. बाजूला बसून आपली मुले स्क्रिनवरती काय काय बघत आहेत याचा अंदाज सुध्दा येत नाही.. परी म्हणाली हेडफोन हवाय ..दिला परीला ! परी म्हणाली आय फोन हवाय दिला परीला ! परी म्हणाली पप्पा मी ट्रिपसाठी जाणार .केला फोन पे ! आणि शेवटी परी म्हणाली मला लोहगडलाच जायचे आहे.. दिली मान्यता. 

अहो ! कोट्याधीश होण्याच्या नादात अनमोल असणारी आपली मुले  काय काय उपद्व्याप करत आहेत , कुठे व्यसनाधिन होऊन झिंगत पडली आहेत व कोणत्या गरजेपोटी पैसे खर्च करित आहेत हे जर आपल्या लक्षात सुध्दा येत नसेल तर आपण सुशिक्षित आहोत का ? हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. 

मुळ मुद्दा आहे घटस्फ़ोट किंवा  घातपात या दोन विषयांचा.. एवढ्यातेवढ्या फालतू कारणास्तव घटस्फ़ोट होतात. जी कारणे लिहायला सुद्धा फालतू गीरी वाटेल. महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशभरात घटस्फ़ोटाची लाटच आली आहे.  नवदाम्पत्याच्या प्रत्येकाच्या हातामधील एक फोन घटस्फ़ोटाचे मूलभूत कारण असू शकतो का ?  वैयक्तिक फोन व त्याद्वारे होत असलेला सामाजिक संपर्क हेही  विचार करायला लावणारे दोन  घटक आहेत . सामाजिक संपर्कातून वाढत जाणारी भलीमोठ्ठी फ्रेंडलिस्ट . दैनंदिन जीवनात आपण इतरांपेक्षा किती सुखी आहोत हा पोकळ आभास निर्माण केला जातो. वरवर वाटणारे  सुखांचे व  प्रगतीचे प्रदर्शन करून अनेकांना आपल्याकडे आकर्षित करणे हे अंतिम  ध्येय असावे का ?  ज्या पद्धतीने आपल्या हाताच्या बोटांना सतत फक्त स्क्रोल करत जायची सवय लागली आहे तशीच ती  मेंदूला सुध्दा लागली आहे. जे काही आपल्या जवळ आहे  , हक्काचे आहे व  स्थिर आहे ते आपण दुर्लक्षित करतो आहोत. मानवाच्या मनाची व मेंदूची केवळ भटकंती  सुरू आहे. याच कारणामुळे आपल्या जीवनातील अस्थिरता वाढते आहे . सतत इतरांचे अनुकरण केल्याने आपल्या कार्य क्षमता लोप पावतात. एखाद्या  गर्भश्रीमंत मुलीने  तिच्या लग्नाच्या वेळी  तीस चाळीस हजारोंचा भरजरी महागडा घागरा घातला म्हणजे मला सुध्दा तशीच  महागडी वस्त्रे असायला हवीत ही मानसिकता हल्लीच्या मुलामुलींमध्ये येत आहे. 

हल्ली  सर्वच ठिकाणी  शाही विवाह सोहळे संपन्न होतात. आपल्या वडीलांच्या आर्थिक क्षमतेनुसार तडजोड करने मुलांना रुचत नाही. त्यामुळे  इतरांच्या पेक्षा एखादी गोष्ट कमी असली तरी  लाडात, वाढलेली पापाची परी  फुटकळ कारणास्तव नाराज होते.. मग सुरू होतो  पिल्लू  व जाणू यांचा  युक्तिवाद.. घटस्फ़ोटाला कारणीभूत असणारी अत्यंत झपाट्याने वाढलेली एक नवीन पद्धत म्हणजे प्री - विडींग शूट. मी सर्वच  लोकांना  गृहीत धरत नाही मात्र ज्या ज्या प्री - विडींग शूट मध्ये दोन दोन दिवस  मुले मुली एकत्र राहतात. व अगदी निर्जन ठिकाणी जाऊन  दिवसभर हजारो फोटो व त्यांच्या पोजसाठी भटकतात तसेच  गोव्यासारख्या  ठिकाणी जाऊन तोकडी वस्त्रे परिधान करून लग्नाच्या अगोदरच अंग प्रदर्शन करतात आणि या सर्व प्रवासात  त्यांचा होणारा दिलखुलास संवाद ,नकळतपणे  विसंगत विचार यामुळे लग्नाआधीच मुलांना व मुलींना एकमेकांविषयी साशंखता निर्माण होत जाते. यावेळी आवर्जून उल्लेख करावा लागतो..जूने तेच सोने. बघाबघीचा कार्यक्रम झाला की साखरपुडा कधी होईल याची ओढ असायची. जरी नजरेला नजर स्पष्टपणे भिडली नसली तरीही लग्नापर्यंत एकमेकांविषयी अनामिक ओढ टिकून असायची.. उखाण्यांमधून एकमेकांचे नाव घेताना आदर असायचा. नकळत होणारे अलवार स्पर्शही रोमरोमातुन पावसाळी सरीसमान  मनाला आनंद देत होते. आणि मग फोटोग्राफर "थोडे जवळ घेऊन स्माईल द्या " असे सांगताच  उपरणे व शालूला मारलेली गाठ अधिक भारावून जायची. ब्राम्हणांनी हातामध्ये एकमेकांना हात धरायले लावले की  सात जन्म हाच हात  घट्ट धरुन ठेवावा ही सात्विक वृत्ती निर्माण होत होती.. पण हल्ली तो स्पर्श, नजरभेट व जाणीवा यांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे.  म्हणूनच आपणांस आधुनिक जीवनशैली मध्ये जगायचे असेल व प्रामुख्याने लग्नाच्या पूर्वी कोणते शुटींग्ज करावयाचे असतील तर किमान ते अश्लील नसावे. पारंपारिक पद्धतीने साजिरे गोजिरे शुटींग्ज सुध्दा करता येतात. प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच. म्हणजे  आपण आपल्या मर्यादा पाळल्या तरच नाती टिकून राहतील. दोन मनांचे मिलन हेच दोन घरांचे मिलन असते.  

संसार टिकवायचे असतील तर विवाह संस्कार टिकला पाहिजे

सुधारित पिढी म्हणजे फक्त  आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करणे नाही तर पारंपारिक विचारसरणी  जपत आधुनिक ज्ञान आत्मसात करून ते  आपल्या व इतरांच्या आयुष्याला सुखकर व  प्रेरणादायी बनविणे आहे . 

एकाच वेळी केतन व चेतनच्या आयुष्याला पूर्णविराम देणारी सिया गोयल केवळ आरोपी  नाही तर ती एक वृत्ती बनली आहे .एकीकडे  आपल्या आईवडिलांना अपार प्रेम करणारी .पण ती त्यांना स्पष्टपणे बोलू शकली नाही तर दुसरीकडे आपल्या मनाची इच्छा पूर्ण  करण्यासाठी व घातपात करण्यासाठी  आतून नियोजित  हत्येची आखणी करणारी वेल प्लॅन किलर बनली. ही द्विधा अवस्था  फक्त एकाच मुलीची आहे का ?  ही बदललेली अथवा बिघडलेली मनस्थिती आज किती घरात  वावर करते आहे माहित नाही. म्हणूनच  आपल्या मुलांवर  योग्य संस्कार, योग्य लक्ष व  त्यांच्या योग्य सहवासाची आपण सोय केली पाहिजे.. कारण पापाची परी ही परीच असावी  कोणासाठी  दरी नसावी !

लेखन - सौ. सविता जितेंद्र माने. 

माहुली /विटा ( आंध्र प्रदेश )   

७७९९५५८९१६.

Post a Comment

0 Comments