Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप


             ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे 

अत्यंत प्रिय व्यक्तीच्या जाण्यानंतर तिचा स्मृतिदिन विवीध पद्धतीने साजरा केला जातो. काहीजण मंदिरात पूजा करतात, तर काही सामाजिक कार्य करून प्रियजनांच्या आत्म्याला शांती व आदर देतात. डोंबिवली तील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ सुलाखे यांनी मात्र त्यांची पत्नी अन्नपुर्णा  यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दुःखाला सामाजिक कार्यात रूपांतरित केले. त्यांनी उल्हासनगरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, वाटून आपल्या पत्नीच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. त्यांच्या पत्नीच्या अकाली निधना नंतरचा हा पहिलाच स्मृतिदिन होता. 



उल्हासनगर कॅम्प नंबर ४, मधिल सुभाष टेकडी येथे ज्ञानदीप विद्यालय आहे. ज्यात भंगारवेचक, असंघटित कामगार, रिक्षा चालक, मोलकरणी यांची मुलं शिकतात. शासकीय अनुदान बंद झाल्याने येथील शिक्षकच स्वखर्चातून ही शाळा चालवताहेत.  या शाळेच्या सभागृहात छोटे खाणी कार्यक्रमाद्वारे १५० विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार कैलास झाल्टे, संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा लोखंडे , सचिव तथा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या लोखंडे,  प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या मराठे या देखील प्रमुख अतिथी म्हणुन या भावपूर्ण कार्यक्रमाच्या साक्षीदार झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वैजनाथही गहिवरले. 
        विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सुलाखे म्हणाले की," माझी पत्नी म्हणायची, शिक्षण हेच खरं दान, एखाद्या मुलाच्या हातात वही पुस्तक दिलं तर आपण त्याचं भविष्य उजळू शकतो. आपण दुःखाला दोन प्रकारे सामोरे जाऊ शकतो. एक तर स्वतःला बंद करून आणि दुसरं दुसऱ्याच दुःख कमी करून. मी हा दुसरा मार्ग निवडलाय असेही पुढे सुलाखे म्हणाले ". या भावपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका स्वाती कांबळे यांनी मांडली. सुलाखे यांचा ओघवता परिचय वैभव ब्राह्मणे यांनी केला. तर सूत्रसंचालन लीना पाटिल आणि आभार प्रदर्शन रेखा मेढे यांनी केले. ज्ञानदीपच्या सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments