धावत्या लोकलमधील तरुणाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांत मोठा प्रशासकीय फेरबदल
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
धावत्या फास्ट लोकलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर रेल्वे पोलीस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांची बदली बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याकडे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
२५ जूनच्या रात्री चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये अंधेरी आणि बोरिवली स्थानकादरम्यान घडलेल्या हत्याकांडानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुसळधार पावसादरम्यान डब्याचे दार बंद करण्याची विनंती केल्याने झालेल्या वादातून २२ वर्षीय मयंक लोहार याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बोरिवली रेल्वे विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अनुभवी अधिकारी पंढरीनाथ कांदे यांची बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याची सूत्रे आता अर्चना दुसाने यांच्या हाती देण्यात आली आहेत.
पंढरीनाथ कांदे यांना पोलीस सेवेत प्रदीर्घ अनुभव आहे. शिक्षक म्हणून कार्य केल्यानंतर त्यांनी २००९ मध्ये पोलीस दलात प्रवेश केला. मुंबई शहर पोलीस, कल्याण रेल्वे गुन्हे शाखा, ठाणे रेल्वे पोलीस तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. खून, दरोडा, अपहरण आणि महिला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.
दरम्यान, अर्चना दुसाने यांच्या नेतृत्वाखाली कल्याण रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तर बोरिवली येथे पदभार स्वीकारल्यानंतर पंढरीनाथ कांदे यांनी रेल्वे स्थानके आणि लोकल गाड्यांमध्ये नियमित सघन तपासणी मोहीम राबविण्यासह संशयित हालचालींवर कडक नजर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments