टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत उपक्रम
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दत्तनगर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत शनिवारी धर्मवीर आनंद दिघे समाजमंदिर, गांधीनगर येथे विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. क्षयरोगाविषयी जनजागृती आणि क्षयरोग निर्मूलनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, नगरसेवक राजन मराठे, नगरसेविका दिपाली पाटील, ज्योती मराठे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अध्वर्यू गौरकर, डॉ. पानपाटील, डॉ प्राजक्ता आणि डॉ प्रीती उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा पूर्णत मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामध्ये AI – पद्धतीच्या आधुनिक मशिनद्वारे मोफत छातीचा एक्स-रे,आरोग्य तपासणी आणि उपचार,कफ नमुना तपासणी, आभा कार्ड नोंदणी तसेच आयुष्मान भारत योजनेबाबत मार्गदर्शन व नोंदणी करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
“टीबी सारख्या आजाराला न घाबरता लोकांनी पुढे येऊन स्वत:ची तपासणी करून टीबी मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावावा” असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी यावेळी केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments