Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डीसीपी-एसीपी बनून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

 

कल्याणमधील एका रहिवाशासह तिघांना अटक....

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई !

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

मुंबई गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट रूप धारण करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कल्याणमधील एका रहिवाशासह तिघांना अटक केली आहे. आरोपी स्वतःला पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे भासवून अनेक वर्षांपासून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी सांगितले की, काही जण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. एका तक्रारदाराने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्याच्याकडून १० लाख रुपये उकळले, मात्र कर्ज मंजूर केले नाही किंवा पैसेही परत केले नाहीत, अशी माहिती दिली होती. तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तक्रारदारामार्फत आरोपींना मुंबईतील द लीला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही रंगेहाथ अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद गौस इब्राहिम खतीब (५४) उर्फ डॉ. राज खतीब, मशाब खतीब आणि शाहिद कपाडिया अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद खतीब हा केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेला असूनही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून लोकांचा विश्वास संपादन करत फसवणूक करत होता. पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद खतीब आणि मशाब खतीब हे सांगली येथील बाप-लेक आहेत, तर शाहिद कपाडिया हा कल्याणचा रहिवासी आहे. शाहिदविरुद्ध मुंबईतील कस्तुरबा मार्ग, साकीनाका आणि खेरवाडी पोलीस ठाण्यांत यापूर्वीच विविध गुन्हे दाखल आहेत.
आरोपींकडून पोलिसांनी बनावट पोलीस ओळखपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात ही टोळी गेल्या सुमारे दहा वर्षांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बनाव करून लोकांची कामे करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीनंतर आरोपी पीडितांना आपल्या बनावट अधिकाराचा धाक दाखवत असल्याने अनेकजण तक्रार करण्यासही घाबरत होते. या टोळीने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आणि एकूण किती रकमेची लूट केली, याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.






Post a Comment

0 Comments