Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विविध मागण्यांसाठी बुद्धभूमी फाऊंडेशनचा केडीएमसी मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा

शेकडो बुद्ध अनुयायांचा सहभाग, आयुक्तांना निवेदन सादर

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी महापालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व फाऊंडेशनचे प्रमुख भंते गौतमरत्न महाथेरो यांनी केले. मोर्चात शेकडो बुद्ध अनुयायी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच महापालिका मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मुख्यालयाकडे जाणारे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.


सकाळी ११ वाजता बुद्ध अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एकत्र आले. तेथून पायी मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासन तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सांगितले की, बुद्धभूमी फाऊंडेशन ज्या जागेचा वापर करत आहे, ती जागा फाऊंडेशनच्या नावावर करण्यात यावी. तसेच फाऊंडेशनच्या जागेवर कथित बेकायदेशीर तोडक कारवाई करणाऱ्या संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तोडक कारवाईदरम्यान तोडण्यात आलेल्या वृक्षांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात यावी. तसेच कारवाईवेळी बौद्ध भिक्षूंवर कथित अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात जातीय भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. मोर्चानंतर बुद्धभूमी फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले

Post a Comment

0 Comments