Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण मधील बुद्धभूमी प्रकरणी १५ जून पासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलन

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 बुद्धभूमी फाउंडेशन व बौद्ध अनुयांवर होत असलेल्या कथित शासकीय अन्याया विरोधात येत्या १५ जून सोमवार पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा भिक्खू संघ व बुद्धभूमी फाउंडेशनच्या विश्वस्तांनी दिला असून, यासाठी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत परवानगीही मागण्यात आली आहे. बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त भंते गौतम रत्न थेरो यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजे चिकनघर येथील बुद्धभूमी परिसरावर मागील अनेक दशकापासून कायदेशीर ताबा व नोंदी असतानाही प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

३० मे रोजी झालेल्या कारवाईत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हटवणे, बौद्ध स्तूप व भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती पाडणे, तसेच ४२ झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप आहे. ही कारवाई लाठी व शास्त्रांच्या धाकावर करण्यात आल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ निलबांची मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल , उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले त्यांच्यावर गुन्हा नोंदवून निलंबित करावे, तसेच कारवाईत सहभागी ६०-७० जणांची ओळख पटवून अटक करावी अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल  बुद्धभूमी परिसराला बाधा न आणता वालधुनी  नदीलगत घ्यावा, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याचबरोबर "बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र" विकसित करून भव्य बुद्ध विहार, विपश्यना केंद्र, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व ५० मीटर उंच बुद्ध मूर्ती उभारण्याची मागणी ही करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी १ कोटींची निधी मंजूर अधिसूचना काढावी, तसेच सर्व निर्णय फाउंडेशनच्या समितीने द्यावेत, अशी अटही ठेवण्यात आली आहे. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास १५ जून पासून शांततामय पण ठाम अनिश्चितकालीन धरणा आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 




Post a Comment

0 Comments