ब्लॅक अँड व्हाईट कल्याण प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी, प्रभावी नेतृत्व आणि विद्युत ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अनिता अमोल चौधरी यांना मानद डॉक्टरेट (Honoris Causa) पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा बहुमान सॉक्रेटिस सोशल रिसर्च युनिव्हर्सिटी (SSRU) आणि दिलासा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य "ऑनोरिस कॉसा इंटरनॅशनल चेंज मेकर्स अवॉर्ड २०२६" सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
मुंबईतील चर्चगेट येथील आयएमसी सभागृहात आयोजित या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती उपस्थित होत्या. समाजपरिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कारासाठी देशाच्या विविध भागांतून ३०० हून अधिक नामांकने प्राप्त झाली होती. तज्ज्ञ समितीने सखोल छाननी, मूल्यमापन आणि निवड प्रक्रियेनंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींची निवड केली. त्यामध्ये अनिता अमोल चौधरी यांची निवड त्यांच्या विद्युत ऊर्जा व्यवस्थापन, नेतृत्व विकास आणि सामाजिक सक्षमीकरण क्षेत्रातील भरीव कार्याच्या आधारे करण्यात आली.
अनिता चौधरी यांनी ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करताना शाश्वत विकास, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना दिली आहे. तसेच महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती आणि नेतृत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. के. योगेश (अध्यक्ष), डॉ. वर्धनंद (माजी संचालक, मुंबई विद्यापीठ), डॉ. सावाको कोबायाशी (जपानी आध्यात्मिक गुरू), डॉ. सेवाकानंद (धर्मसुधारक), डॉ. विजय नारायण पंडितजी (अध्यक्ष, अग्रवाल व सोनावणे महाविद्यालय तसेच लेखक), डॉ. पद्मिनी कृष्णा (शिक्षणतज्ज्ञ आणि राष्ट्रवादी विचारवंत) आणि डॉ. शाहिधरन (कॉर्पोरेट प्रशिक्षक) यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर अनिता चौधरी यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार भविष्यात अधिक जोमाने आणि जबाबदारीने समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता अमोल चौधरी यांना प्राप्त झालेला हा मानद सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच, शिवाय समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
.jpg)



Post a Comment
0 Comments