Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अणू-व्रत...

 

                        ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

गेले काही महिने आमचा चहावाला पेपर-कप मधून चहा द्यायला लागला होता . स्टीलच्या वाट्यांमधून चहा कॉफी देणं त्याने थांबवलं . काही दिवस असा चहा घेतला खरा पण मनात निषेधाची तार वाजत होती .  फेब्रुवारी महिन्यापासून मात्र आम्ही दुकानात हे पेपर-कप वापरणं बंद केलं . शेजारच्या मुकेश स्टीलच्या दुकानातून दुकानात काम करणाऱ्या ( माझ्यासकट)  प्रत्येकासाठी छान छोटे स्टीलचे ग्लास आणून ठेवले . म्हटलं तर गोष्ट खूप छोटी आहे. पण तरीसुद्धा या अटॉमीक हॅबीट् बद्दल थोडं लिहावंसं वाटलं .

जेम्स क्लियर या लेखकाचं अटॉमिक हॅबीट्स हे पुस्तक खूप गाजलं . आपल्या सवयींमध्ये जाणीवपूर्वक केलेला एक छोटासा ( अणू एवढा छोटा) बदल देखील खूप आश्चर्यकारक असे परिणाम दाखवू शकतो ही या पुस्तकाची संकल्पना आहे . हे पुस्तक प्रचंड प्रमाणात विकलं गेलंय , असंख्य भाषांत त्याचे अनुवाद झाले आहेत आणि ते खरोखरच सशक्त गाभा असलेलं पुस्तक आहे यात वादच नाही . पण नवीन काहीतरी वेगळं दिसलं की ते उचलून धरण्याची पाश्चात्य मंडळींना सवय आहे  आणि त्यांचं अनुकरण करण्यात आपण आपल्याला धन्य मानतो  हेही तितकंच खरं आहे . 

हीच संकल्पना जैन धर्मात अणू-व्रत या नावाने ओळखली जाते . माझा जैन धर्माचा विशेष अभ्यास आहे अशातला भाग नाही . पण माझे बरेच मारवाडी आणि कच्छी मित्र जैन-धर्मीय असल्याने त्यांच्या समाजाच्या  कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा बऱ्याचदा योग येतो . अशाच एका कार्यक्रमात मला या अणू व्रताची थोडीफार माहिती समजली . जेम्स क्लियरच्या कित्येक शतकं आधीपासूनच हे व्रत प्रचलित आहे . त्यांचंही सांगणं तेच आहे की एक अगदी साधं सोपं उद्दिष्ट गाठायचा संकल्प ठेवा . ते साध्य करण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करा . उदाहरणार्थ मी रोज सकाळी सात वाजता उठतो . पण सकाळची नित्यकर्म करताना व्यायाम करायला वेळ मिळत नाही . व्यायामासाठी समजा रोज पंधरा मिनिटं गरजेची आहेत . एकदम पंधरा मिनिटं रोज लवकर उठणं लगेच जमणार नाही . पण हे उद्दिष्ट तीन महिन्यात साध्य करायचं असं ठरवता येईल . त्यासाठी पहिला महिना मी रोजच्यापेक्षा पाच मिनिटं लवकर उठेन . दुसऱ्या महिन्यात अजून पाच मिनिटं आणि तिसऱ्या महिन्यात आणखी पाच मिनिटं !

मुख्य मुद्दा हा की आपल्या सवयींमध्ये केलेले खूप छोटे बदलसुध्दा परिणामकारक ठरू शकतात .

पेपर कप हे नाव दिसायला निरुपद्रवी वाटलं तरी प्रत्यक्षात ते तसं नाही . मुळात कोणत्याही कागदात ओली वस्तू किंवा ओला पदार्थ ठेवता येणार नाही . त्यातून उकळता चहा ( तपमान किमान १००° च्या पुढे) साध्या कागदी कपात रहाणं अशक्य . म्हणजे त्या कागदाला आतून अतिसूक्ष्म असा प्लास्टिकचा थर देणं अपरिहार्य असतंच ! हा थर असतो पॉलीप्रोपिलीन किंवा पॉलीइथिलीनचा ! म्हणताना जरी पेपर कप बायो-डीग्रेडेबल म्हटलं तरी कागदापासून हा प्लॅस्टिकचा पापुद्रा वेगळा करणं ही प्रचंड खर्चिक बाब आहे . आपल्या साध्या मराठीत सांगायचं तर.... "चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला "!!  त्यातून आपल्या अंगवळणी पडत चाललेली "USE AND THROW" ची घातक प्रवृत्ती बघता असे वापरलेले पेपर-कप एकत्र करून री-सायकल करायला पाठवणं हे तर दिवास्वप्न ठरेल . 

साधी आकडेवारी सांगायची तर  आम्ही दुकानात रोज दोनदा चहा-कॉफी घेतो . म्हणजे पाच जणांचे रोजचे दहा कप ..... महिन्याला सुट्टीचे चार दिवस सोडून दोनशे साठ ( २६०) कप ..... याप्रमाणे वर्षाला ३१२० कप ..... 

फडके रोडवरच्या एका दुकानाचे हे आकडे आहेत .... संपूर्ण फडके रोडचा महिन्याचा हिशोब सुद्धा डोकं चक्रावून टाकणारा असेल !!

चहावाल्या मंडळींनी अलीकडे त्यांच्या सोयीसाठी स्टीलच्या वाट्यांतून चहा-कॉफी देणं बंद केलं . आणि आपणही ते सहजपणे स्वीकारलं .... कधी कधी चुकीच्या गोष्टींना ठामपणे नकार द्यावा लागतो ....

आज सहज गप्पा मारताना लक्षात आलं की माझा मित्र राकेश कोठारी याच्या "राकेश ज्वेलर्स" मध्ये आणि पुढे    "मारू अप्लायन्स" मध्ये सुद्धा स्टाफमधील प्रत्येकासाठी वेगळा स्टील ग्लास किंवा काचेचा कप आहे .

थोडं मनावर घेतलं तर आपल्यापैकी अनेकांना हे सहज शक्य असेल .... करून बघूया ..!!!!

   ----  मयूरेश गद्रे,डोंबिवली

  

Post a Comment

0 Comments