आयगॉट प्रशिक्षण प्रणालीत प्रथम क्रमांक
‘टॉप परफॉर्मिंग एमडीओ लीडर’ राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमोद नांदगावकराना गौरविले
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
राज्य शासनाच्या ‘महासाधना सप्ताह २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी 2.0’ उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत डिजिटल प्रशासन क्षेत्रात आपली दमदार छाप उमटवली आहे. आयगॉट प्रशिक्षण प्रणालीवर सर्वाधिक नोंदणी आणि प्रशिक्षण पूर्णत्वाची उल्लेखनीय कामगिरी करत मंडळाने तंत्रज्ञानाधारित प्रशासनात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, टिटवाळ्यातील रहिवासी आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले प्रमोद नांदगावकर यांना ‘टॉप परफॉर्मिंग एमडीओ लीडर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने टिटवाळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच सदस्य सचिव राहुल रेखावार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने प्रभावी वाटचाल केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.
‘टेक वारी 2.0’ कार्यक्रमादरम्यान २५० ते १४९९ कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांच्या गटामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तथा एमडीओ लीडर प्रमोद नांदगावकर यांचा ‘टॉप परफॉर्मिंग एमडीओ लीडर’ म्हणून गौरव करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
प्रमोद नांदगावकर हे केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे तर टिटवाळा परिसरातील विविध सामाजिक कार्यातही सातत्याने सक्रिय असून, त्यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे स्थानिक स्तरावरही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशिक्षण व्यवस्थेचे सक्षम नियोजन आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रक्रियेशी जोडण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची भावना व्यक्त होत आहे.
या दुहेरी यशामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीची राज्यस्तरावर विशेष दखल घेतली जात असून, डिजिटल प्रशिक्षण आणि प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये मंडळ इतर शासकीय संस्थांसाठी आदर्श ठरत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच प्रशासन अधिक सक्षम, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी मंडळ सातत्याने कार्यरत असल्याचे या गौरवातून पुन्हा अधोरेखित झाले आहे
.jpg)

Post a Comment
0 Comments