Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा मृत्यू

 
                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऋषिकेश पवार असे या मृत कैद्याचे नाव असून, जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिडेंटच्या खाजगी बोलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. ५ वाजता छातीत दुखत असताना त्याला नऊ वाजेपर्यंत रुग्णालयात का आणले नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला.
डोंबिवलीचा रहिवासी असलेला ऋषिकेश पवार एका वादाच्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोठडीत होता. २० एप्रिल रोजी एका आठवडा बाजारातील मुकादम सोबत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करत उल्हासनगर हिल लाईन पोलीस पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मध्ये कल्याण आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. याच दरम्यान मंगळवारी   सायंकाळी सुमारे ५ वाजता ऋषिकेश यांच्या छातीत दुखू लागले होते. मात्र या वेळी त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्याऐवजी सुमारे साडेनऊ वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणण्यात आले.
यावेळी ॲम्बुलन्सऐवजी जेल प्रशासनाच्या खाजगी बोलेरो गाडीतून त्यांना आणण्यात आले असून त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते, तर तो वाचला असता,” जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments