संस्था चालकाला पाठीशी घालणाऱ्या शिक्षणाधिकारी ठाणे यांच्यावर कारवाईची मागणी.
ब्लॅक अँड व्हाईट शहापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद ठाणे चे शिक्षणाधिकारी तसेच शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने, तसेच माहिती अधिकारात जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे संबंधित शाळेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिल्यानंतरही कारवाई का होत नाही, असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी व अर्ज देऊनही अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप करत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अण्णा मोतीराम साळवे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, शालेय शिक्षण सचिव, प्रधान सचिव व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित शाळांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील रिद्धी सिद्धी ज्ञानाई एज्युकेशन सोसायटी संचलित आर. के. पालवी स्कूल व श्री लॉर्ड गणेशा स्कूल (CBSE) या शाळांना सन २०१७ मध्ये शासनाकडून परवानगी देताना जागेच्या अटी व इतर आवश्यक अटी सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या अटींची पूर्तता न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरीदेखील या शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.
माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांमध्ये ७/१२ उतारे, इमारतीचा भाडेकरार, शिक्षकांची पात्रता, पायाभूत सुविधा, ऑडिट रिपोर्ट तसेच EWS प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी व संशयास्पद बाबी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात संबंधित शिक्षण विभागाकडे अनेक वेळा निवेदने, पुरावे व लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या. मात्र कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अण्णा साळवे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे संबंधित शाळांची मान्यता तात्काळ रद्द करावी, संस्थाचालक व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments