मुरबाडच्या शहराच्या सौंदर्यात भर....
ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड -प्रतिनिधी(दिलीप पवार )
मुरबाड विधान सभेचे आमदार किसन कथोरे हे नवनविन विकास कामांच्या माध्यमातून मुरबाड शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. नुकताच मुरबाड शहराच्या मुख्य नाक्यावरील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील नव्याने उभारण्यात आलेला भव्य उड्डाणपूल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे.
लहान सहान कामे बहूतेक मार्गी लागली असून नव्याने उभारलेल्या उड्डाण पुलावर विद्युत व्यवस्थाही करण्यात असल्याने रात्रीच्या रोषणाईने अक्षरशः लखलखू लागला आहे. पुलावर दोन्ही बाजूंनी उभारण्यात आलेल्या शेकडो एलईडी दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण परिसर झगमगून निघत असून, मुरबाडच्या शहर सौंदर्यात मोठी भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुलावरील दिवे नियमितपणे सुरू होत असल्याने रात्रीच्या वेळी हा पूल एखाद्या महानगरातील आधुनिक रस्त्याची अनुभूती देत आहे.उंच व सरळसोट रेषेत दूरवर पसरलेली दिव्यांची माळ, मध्यभागी उठून दिसणारी दुभाजक रचना आणि चमचमणारा काँक्रीटचा रस्ता यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अंधारामुळे वाहनचालकांना रात्री प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अत्याधुनिक एलईडी प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण पूल उजळून निघत असल्याने रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला आहे. पुलावरील प्रकाशामुळे रस्त्याची स्पष्ट दृश्यता निर्माण होत असून अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
रात्रीच्या वेळी पुलावरून जाणारे वाहनांचे दिवे आणि त्यात मिसळणारी एलईडी रोषणाई यामुळे परिसराला एक वेगळीच आकर्षक झळाळी प्राप्त झाली आहे. अनेक तरुण आणि नागरिक पुलाजवळ थांबून छायाचित्रे व व्हिडीओ काढताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही या पुलाच्या रोषणाईचे फोटो पाहायला आहेत. तर शहरातील नागरिकांनी पुलावरील प्रकाशयोजनेचे स्वागत करताना, भविष्यात अशाच प्रकारे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवरही आकर्षक प्रकाश व्यवस्था उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments