Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची दुरावस्था. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

कलाकारांना नाटकाच्या प्रयोगात सहन करावा लागला मनस्ताप !
रंगमंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची केली मागणी..!

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुरवस्थेच्या विरोधात अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. याबाबत या नाटकाच्या कलाकारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. बोरगावकर यांनी देखील या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केडीएमसी प्रशासनाने नाट्यगृहाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.  

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे नाट्यगृह हे शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे होत असतात. मात्र सध्या या नाट्यगृहातील सुविधांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये थिएटरमधील अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. अभिनेत्री श्रद्धा हांडेने वारंवार विजेच्या ठिणग्या पडत असल्याची माहिती दिली. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की नाटक मध्येच थांबवावे लागते. तिने सांगितले की, गेल्या काही वर्षांत तांत्रिक समस्यांमुळे थिएटर चार ते पाच वेळा थांबवावे लागले, ज्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही मोठी गैरसोय झाली.

अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले की, या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लॉकडाऊननंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते, मात्र त्या काळात नेमकी कोणती कामे झाली आणि खर्च केलेला निधी कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तर व्यवस्थापक राहुल पवार यांनी बोलतांना, कलाकारांना प्रयोग सादर करतांना त्रास होत असून याबाबत अत्रे रंगमंदिराच्या व्यवस्थापकांना वारंवार सांगून देखील त्यावर कोणतीही विचारणा झाली नाही. याबाबत आम्ही प्रेक्षकांची माफी मागितली. मात्र अत्रेचे व्यवस्थापक आलेच नाही. याआधी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील त्रुटींबाबत त्यांना सांगितले असता, हे असच असून तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर करा असे उर्मट उत्तर दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. सगळ्यांना हा त्रास होत असून पुढे मात्र कोणी येत नाही. त्यासाठी आम्ही पुढे आलो असल्याचे सांगितले.

हा कलाकारांचा झालेला उद्रेक आहे, तो उद्रेक गांधीगिरीच्या माध्यमातून केला असून वारंवार  तक्रार  करून देखील लक्ष न दिल्याने हा उद्रेक झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  वतीने पत्राद्वारे केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधणार असून आणि सभागृहात देखील  याबाबत आवाज उठविणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले.    
 याबाबत अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, वाढत्या उष्णतेमुळे आणि विजेवरील जास्त भारामुळे नाटकाच्या प्रयोगादरम्यान तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत जनरेटर सुरू होण्यासाठी काही सेकंद लागतात. नाट्यगृहात स्वच्छता राखण्यासाठी प्रेक्षकांना आवारात उरलेले अन्न न टाकण्याचे वारंवार आवाहन केले जाते, परंतु अनेक लोक नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे उंदीर आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागते.

Post a Comment

0 Comments