ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने पटपडताळणी मोहिमेत ९१ टक्के काम पूर्ण करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून एक मोठी शैक्षणिक कामगिरी नोंदवली आहे. या यशाचे श्रेय प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि संपूर्ण शिक्षक व तंत्रस्नेही टीमच्या कल्पक नियोजनाला जाते.
शासना निर्देशानुसार दिनांक ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी पटपडताळणी करण्याबाबतचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती वेळेत आणि अचूकपणे प्रविष्ट करणे हे एक मोठे आव्हान होते. या आव्हानाचा स्वीकार करत, महापालिकेचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या आदेशानुसार आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने या मोहिमेचे नियोजन केले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती, ज्यामध्ये २१ सी.आर.सी. अंतर्गत शाळांचे सखोल नियोजन करण्यात आले. या कार्यात सी.आर.सी. प्रमुख, विशेष शिक्षक, वरिष्ठ शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षकांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा ठरला.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर चंदन माने, विषयतज्ञ राजू शेप आणि टेक्नोसेव्ही शिक्षक विलास लिखार यांनी परिश्रम घेऊन तांत्रिक बाजू सक्षमपणे हाताळली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि योग्य नियोजनामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने निर्धारित वेळेत ९१ टक्के काम पूर्ण करून ठाणे जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments