ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एमआयडीसी मधील काँक्रिट रस्ते आरपार तोडायची
मालिका अद्याप चालू असून सोमवार पासून डोंबिवली
नागरी सहकारी बँक मुख्य कार्यालय, सोनारपाडा ते
आईस फॅक्टरी, मानपाडा रोड या जोडणाऱ्या रहदारीच्या
महत्त्वाच्या रस्त्यावरील इंडस कंपनी, अभिनव
शाळेजवळ काँक्रिट रस्ता नाल्याच्या कामासाठी
तोडण्यास सुरवात झाली असून हा रहदारीचा वर्दळ
असलेला रस्ता कमीतकमी एक महिना वाहतुकीसाठी
आता बंद राहणार आहे.
डोंबिवली एमआयडीसी एसटी स्टँड वरून कोकण, पुणे घाटमाथ्यावर जाणाऱ्या एसटी बसेस याच मार्गावरून पुढे जात येत असल्याने त्यांना आता दुसऱ्या मार्गाने जावे लागेल. याच रस्त्याच्या एका बाजूला एमआयडीसी औद्योगिक वसाहत, कारखाने असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निवासी वसाहत, शाळा, व्यापारी गाळे इत्यादी आहेत. या एमआयडीसी फेज दोन मध्ये यापुर्वी अमुदान, प्रोबेस अशा रासायनिक कंपनीत मोठे स्फोट झाले होते. विशेष म्हणजे ते स्फोट मे महिन्यातच झाले असल्याने दुर्दैवाने अशा काही दुर्घटना पुढे घडल्यास अग्निशमन दल व रुग्णवाहिका येण्यास हा महत्वाचा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने वेळ लागणार आहे. या सर्व कारणांमुळे सर्वांना याचा जबरदस्त फटका बसणार आहे.
एमआयडीसी ठेकेदाराकडून या नाल्याचे बांधकाम करण्यात येत असून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सर्वांची गैरसोय होणार तर आहेच शिवाय चांगला रस्ता तोडण्यामुळे नाहक भुर्दंड सर्वांना पडणार आहे. ही गटार, नाल्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार की अर्धवट राहणार हे पुढे काही दिवसांतच समजेल. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू होण्याचे भाकित यावेळी वर्तविण्यात आले आहे. यावेळी नालेसफाईची कामे केडीएमसी कडून अद्याप सुरू झाली नसल्याने आणि त्यात नवीन नाल्याची कामे जर अर्धवट राहिली तर येत्या पावसाळ्यात मोठा हाहाकार या परिसरात होऊ शकतो. याचा मुख्यते फटका एमआयडीसी सह सागर्ली, आजदे गाव इत्यादी परिसराला बसू शकतो. एमआयडीसी आणि केडीएमसी यांनी वेळीच दखल, खबरदारी घेऊन पाऊले उचलणे आवश्यक आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments