Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

उघड्या नाल्यांमध्ये शेण टाकल्याप्रकरणी 21 तबेला चालकांवर गुन्हा दाखल

नागरी आरोग्याच्या दुष्टीकोनातून २१ तबेला चालकावर पर्यावरण कायद्यानुसार कारवाई

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शहरातील स्वच्छता व्यवस्थेला धक्का देणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका  क्षेत्रातील ‘क’ प्रभागात उघड्या नाल्यांमध्ये आणि रस्त्यांवर म्हशींचे शेण व मलमूत्र टाकून सार्वजनिक स्वच्छतेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी 21 तबेला चालकांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई केडीएमसीचे स्वच्छता अधिकारी जितेंद्र यादव यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, 2023 पासून या भागात नाले तुंबणे आणि परिसरात दुर्गंधी पसरत असल्याच्या सतत तक्रारी येत होत्या. तपासात समोर आले की अनेक तबेला चालक नियमांचे उल्लंघन करत उघडपणे पशूंचा कचरा थेट नाल्यांमध्ये आणि रस्त्यांवर टाकत होते. महापालिकेकडून वारंवार नोटीस आणि स्वच्छता मोहिमा राबवूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. उलट या निष्काळजीपणामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला. तक्रारीत असेही नमूद आहे की या प्रकारामुळे महापालिकेच्या कामकाजावर आणि शहराच्या प्रतिमेवर परिणाम होत होता.
यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता  कलम 271 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनस मौलवी, मकसूद खोत, शाहिद मौलवी, अफसर मौलवी, सलीम पठाण यांच्यासह एकूण 21 तबेला चालकांचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईनंतर बेकायदेशीरपणे दुर्गंधी पसरवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या या कठोर कारवाईचे स्वागत केले आहे.
       याबाबत "क" प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाल्यामध्ये म्हशीचे शेण मलमूत्र टाकत असल्याने नागरी आरोग्याच्या दुष्टीकोनातून २१ तबेला  चालकावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments