Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अत्याचार रोखण्यासाठी शिक्षणात संस्कार मूल्ये व सोशल मीडियावर नियंत्रणाची मागणी

               ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड (रमेश घरत)

 राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात नैतिक मूल्यांची घसरण चिंताजनक ठरत असल्याचे मत व्यक्त करत, शहापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात त्यांनी विशेषतः शिक्षण क्षेत्रात संस्कार व मूल्य शिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित केली आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करावेत, तसेच विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच सोशल मीडियावर वाढत चाललेला अतिरेक, अश्लील व दिशाभूल करणारा मजकूर, तसेच द्वेषपूर्ण प्रचार यामुळे समाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर ठोस धोरण आखावे, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी वैशाली पाटील यांनी केली आहे.

महिलांवरील अत्याचार, अल्पवयीनांवरील गुन्हे आणि समाजातील वाढती असंवेदनशीलता रोखण्यासाठी शासनाने सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, कायदा आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांत समन्वय साधूनच या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या निवेदनाची दखल घेऊन शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments