Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणात हॉटेल व्यावसायिकांसाठी जनजागृती कार्यक्रम

कृत्रिम (अनालॉग) पनीर, चीज वापराबाबत अन्न- औषध प्रशासनाचे कडक निर्देश

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणे आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणे अत्यावश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून परवाना निलंबन किंवा रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौक येथील हॉटेल वृंदावन व्हेज येथे कल्याण हॉटेल असोसिएशनच्या सर्व सदस्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच कल्याण विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमात हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम (अनालॉग) पनीर/चीज संदर्भातील नियम, त्याचे ग्राहकांना देताना पाळावयाच्या अटी तसेच त्यावरील कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अन्न - औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अनेक ठिकाणी ‘चीज अनालॉग’ (cheese analogues) म्हणजेच कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी संबंधित पदार्थाबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक अधिकारी प्र. म. देशमुख यांनी कल्याण शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणे आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश हॉटेल व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहकांना सुरक्षित आणि पारदर्शक अन्नसेवा मिळावी हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.





Post a Comment

0 Comments