Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

८ हजारांच्या थकबाकीमुळे कल्याणच्या जॉइंट सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित

     उन्हात नागरिकांचे हाल

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
 कल्याण पश्चिम कर्णिक रोड परिसरातील जॉइंट सब-रजिस्ट्रार क्रमांक १ कार्यालयात आज प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या ८ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणकडून कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मालमत्ता नोंदणीसारखी महत्वाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. 

 मालमत्तेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दूरदूरवरून आलेले नागरिक कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर भर उन्हात ताटकळत उभे राहिले. तर काहीजण आत मध्ये अंधारात बसले, अनेकांनी कामासाठी विशेष सुट्टी काढून कार्यालयात हजेरी लावली होती. मात्र वीज नसल्याने संगणकीय प्रक्रिया बंद पडली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. यामध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. 



दरम्यान, कार्यालयातील काही कर्मचारी मात्र मोबाईलवर व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर बाहेर नागरिक त्रास सहन करत असल्याने संतापाची लाट उसळली. अवघ्या काही हजारांच्या थकबाकीमुळे महत्वाच्या सरकारी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित होणे ही बाब प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देणारी असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे कल्याणच्या  सब-रजिस्ट्रार कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Post a Comment

0 Comments