८ मार्च हा जागतिक महिला दिन महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक कामगार चळवळीची आठवण म्हणून साजरा केला जातो. १९१७ मध्ये रशियातील महिलांनी 'Bread and Peace' यासाठी केलेल्या संपानंतर ८ मार्च ही तारीख जागतिक स्तरावर निश्चित झाली. हा दिवस महिला सक्षमीकरण, समानता आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
फक्त एक दिवस सन्मान किंवा स्त्रियांची एका दिवसापूर्वी स्तुती म्हणजे समानता नाही.
मी एक स्त्री आहे; म्हणूनच कदाचित हे विषय बारकाईने मांडू शकते.
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या हातात लेखणी दिली ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लेखणीला जाती-पातीच्या विळख्यातून मुक्त करून तिला अधिकार आणि घटनात्मक बळ दिले ते रमाईच्या पाठिंब्यामुळे या लढ्याला मानवी स्पर्श लाभला. स्त्रियांना साक्षरता मिळाली, अधिकार मिळाले; परंतु विचारांची उंची वाढवणे हे कार्य आपल्यालाच करावे लागेल.
संविधानाने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला; परंतु हा अधिकार खरोखरच तळागाळातील स्त्रीपर्यंत पोहोचला आहे का? हळदी-कुंकू, महिला दिन, कर्तृत्ववान महिला पुरस्कार या माध्यमातून स्त्रियांचे कौतुक होते; पण स्तुती म्हणजे समानता नव्हे.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले जाते, तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात समानतेच्या अधिकारापासून तिला अनेकदा वंचित ठेवले जाते. स्त्री ही प्रथम माणूस आहे, हे आपण विसरतो.
पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या स्त्रीला आजही रूढी, परंपरा आणि संस्कृतीच्या बंधनातून जावे लागते. महागाई, स्पर्धा आणि उच्चभ्रू देखाव्याच्या या समाजात पुरुषाने तिला घराबाहेर पडण्याची, नोकरी करण्याची परवानगी दिली; पण काही अटींसह. घरात मात्र तिचे स्थान अनेकदा गौणच राहते. पती-पत्नीमध्ये खऱ्या अर्थाने समानता का दिसत नाही?
माझ्या 'स्त्री' या कवितेतून व्यक्त होताना मी सांगते की, मान मरातब समाजामध्ये 'तिला'
थक्क झाले सर्वजण पाहून पण आजही पती आणि पत्नीमध्ये 'ती' चे स्थान आहे गौण
समाजामध्ये स्त्रियांना बऱ्याच ठिकाणी आठ मार्च रोजी सन्मानित केले जाते, पुरस्कार दिले जातात, कौतुक केले जाते. परंतु तिचा हा कौतुक सोहळा तिच्या घरातून होतो का? तिच्या कुटुंबातून होतो का? तिचे आप्तस्वकीय नातलग यांच्याकडून होतो का?
या प्रश्नांची उत्तरे शोधताना अनेकदा स्त्रीच स्त्रीसाठी अडथळा ठरते, असे जाणवते. आपल्या समाजात लेकीला ज्या नजरेने पाहिले जाते, त्या नजरेने सुनेला का पाहिले जात नाही? ‘सासू’ हीदेखील एक स्त्रीच आहे; तिची भूमिका आईपासूनच सुरू होते.
स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार आई-वडिलांनी लहानपणापासून रुजवले पाहिजेत. घरातील कामांची विभागणी लिंगाधारित नसून समतेने झाली पाहिजे. स्वयंपाक किंवा भांडी ही केवळ स्त्रियांची मक्तेदारी आहे, हा विचार बदलला पाहिजे. अन्यथा सासू-सुनेच्या नात्यात बंधने वाढतात, सुनेकडून अपेक्षा वाढतात, नोकरी जरी करत असली तरी, परंपरेने ठरत आलेली कामे तिनेच केली पाहिजेत आणि त्यामुळे नात्यांमध्ये कटूपणा येतो. रुढी-परंपरेच्या बंधनांच्या साखळ्या तिच्या पायात अडकवल्या जातात आणि सो कॉल्ड इज्जत, घराणी, खानदान यांचे दाखले देत अलिखित आणि मनमानी नियम लादले जातात त्यामुळे होतकरू, गुणवंत स्त्रिया कुटुंबापासून दुरावतात. विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारतात आणि नोकरी, घर आणि संसार सांभाळताना त्यांची स्वतःची फरफट तर होतेच परंतु नवीन पिढीची सुद्धा फरपट होते त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतो. त्यांच्या मुलांची फरफट होते. पाळणाघर, अंगणवाड्या या ठिकाणी मुले ठेवून स्त्रिया नोकरी करतात. अशा मुलांना कुटुंबापासून वेगळे राहावे लागते आणि मग पुन्हा सर्वांनाच एकांतपणामुळे मानसिक तणावातून जावे लागते. काही ठिकाणी सो कॉल्ड स्वातंत्र्याच्या नावाखाली सुना अतिशयोक्ती करतात त्यामुळे पुरुषांचे तर हाल होतातच परंतु संपूर्ण कुटुंबाचे देखील हाल होतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांचा.
कामाच्या ठिकाणीही अनेकदा महिलांना वरिष्ठ महिला किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. राजकारण, प्रशासन, शैक्षणिक संस्था सर्वत्र हीच व्यथा आढळते. योग्यता असूनही काही स्त्रियांना अपमान किंवा प्रगतीतील अडथळे सहन करावे लागतात.
खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या समानतेसाठी स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे. तळागाळातून समानतेची बीजे रुजली पाहिजेत. क्रांती ही सामान्य माणसापासूनच जन्माला येते. एक सासू, एक सून, एक नणंद, एक भावजय या सर्वांनी प्रयत्नशील होऊन घराघरातून समानतेचा धडा दिला, तरच स्तुतीपेक्षा समानता लाभेल.कारण स्तुतीने अहंकार वाढतो किंवा तात्पुरते समाधान मिळते; पण प्रगती होत नाही.
माझ्या 'इच्छा परा, ते येई घरा' या कवितेतून मी मांडते की,
आयुष्याच्या पटावरती बुद्धिबळाचा रंगतो डाव पांढरीनेच पांढरीला शह द्यावा यापेक्षा दुःखद कोणता घाव
आज जागतिक महिला दिनानिमित्त माझी सर्व स्त्रियांना नम्र विनंती आहे,घरातील नातेसंबंधांमध्ये समानतेचा आदर्श दाखवा. प्रत्येक स्त्रीला तिच्या कर्तव्यांसोबत स्वातंत्र्य आणि सन्मान द्या. स्त्री-पुरुष, पती-पत्नी नात्यांमध्ये कुणीही भरडले जाणार नाही, अशी संस्कृती निर्माण करा.तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-मुक्ती आणि समानतेचा विजय साकार होईल.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौ. सुचिता बागडे-खाडे
.jpg)

Post a Comment
0 Comments