ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला, विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी, महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९ हजार १११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी तो रेकॉर्ड केला.
त्यावेळी डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासि चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट, मेडल हस्तांतरीत केले. त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. महिला, विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले.
.jpg)





Post a Comment
0 Comments