आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी सामाजिक व राजकिय सुधारणांची थोर आणि प्रदिर्घ अशी परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांपासून ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर विभूतींपर्यंत याबरोबरच राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, इंदिरा गांधी यांसारख्या स्त्रियांनीही आपले प्रभुत्व सिध्द करून दाखवले आहे. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार हा स्त्रियांचा विकासाचा पाया आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग,सामाजिक सुधारणा व उत्पादन प्रक्रियेचा स्त्रिया एक महत्वाचा अविभाज्य घटक आहेत. या महत्वपूर्ण तत्वाकडे काहीसे दुर्लक्ष होऊन स्त्रियांच्या योगदानाची नोंद घेतली गेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी एकूणच सामाजिक, आर्थिक, राजकिय जीवनात स्त्रिया मागे असल्याचे दिसून येते. कौटुंबिक आणि सामाजिक असुरक्षितता, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्य आणि इतर दैनंदिन सुविधांचा अभाव याचा परिणाम त्यांच्यावर प्रकर्षाने दिसून येतो. दारिद्रय, कुपोषण बालमृत्यू, स्त्री भृणहत्या यामुळे स्त्रियांचे समाजातील घटत चाललेले प्रमाण, स्त्रिया व मुलींची विक्री, वाढता शरीर व्यापार यातून त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होताना दिसून येते.
स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीपुरुषसमानता हे आजच्या दिवसात परवलीचे शब्द आहेत परंतु दुदैवाने या शब्दाचेही आपण चुकीचे अर्थ घेतो स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रियांनी पुरुषासारखं वागणं किंवा पुरुषांविरुद्ध लढा देणे नव्हे तर स्त्री पुरुष सहजीवन असा आहे. स्त्री आणि पुरुष विचार,भावना आणि दृष्टीकोन यांच्याबाबतीत भिन्न असले तरी एकमेकांबद्दल आदर असणे. स्त्री भेदभाव नष्ट करून, लिंगसमभाव ही मूल्ये जोपासून स्त्रियांना प्रत्यक्षात सन्मानाने जगता येणे. त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी आणि स्थान मिळणे. दोघेही समान पातळीवर समान महत्वाचे आहेत हे ओळखून बदललेल्या परिस्थितीशी सुसंगत व एक व्यक्ती म्हणून निसर्गाने व घटनेने दिलेले अधिकार सक्षमपणे वापरता यायला हवेत. आज जागतिक पातळीवर असे एकही क्षेत्र नाही जिथे महिलांचा सहभाग नाही. सद्यस्थितीत महिलांवरील अत्याचार, हिंसा, महिला विषयक कायदे, त्यांच्या आर्थिक दर्जात सुधारणा, प्रसार माध्यमांची भूमिका, स्वयंसेवी संस्थांमधील सहभाग, महिलांना केंद्रस्थानी मानून केलेलं नियोजन, स्वयं सहाय्यता बचत गटांचा विकास, महिलांचा हक्क आणि कायदे याविषयी जनजागृती यावर भर देण्यात आला आहे. तरीही बदलत्या काळानुसार आणि सामाजिक परिस्थितीनुसार स्त्रियांपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. नजिकच्या काळात झालेल्या हिंसाचाराच्या घटना यामुळे महिलांच्या संरक्षणाचा अधिक विचार होणे आवश्यक आहे. केवळ कठोर कायदे करून या समस्या सुटणार नाहीत तर समाजामध्ये स्त्रियांबद्दल आदराची भावना निर्माण करणे आणि त्या दृष्टीने समाजाच्या मानसिकेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. स्त्रियांसाठी केलेल्या सर्व कायदेशीर तरतुदी केवळ कागदावर न राहता त्यांची काटेकोर अंमल बजावणी झाली पाहिजे.
आजची स्त्री विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. या प्रवासात तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातूनच ती सक्षमपणे घडत आहे. आजच्या स्त्रीजीवनामध्ये रूढी, परंपरा आणि धार्मिकतेचा पगडा कमी होऊन शिक्षण, अर्थार्जन, राहणीमान यामध्ये अमुलाग्र बदल झालेले दिसून येत असले तरी त्यांच्यात आत्मसन्मान आणि आत्मभान आलेले दिसत नाही. तिला करिअर क्लॉक,बायालॉजिकल क्लॉक आणि पर्सनॅलिटी क्लॉक यांचा मेळ साधणे कठीण होत आहे. आजही अनेक कुटुंबात ती पुढे जाताना स्विकारणे जड जात असल्याचे दिसते. अजूनही तिला समानतेच्या पातळीवर वागविले जात नसल्यामुळे तिच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेक सीमांवर लढताना तिला पाठीराख्यांची गरज भासतेच, मन पोखरणाऱ्या समस्येची निरगाठ हळुवारपणे सोडवणारा, ज्याच्याकडे सर्व प्रश्नाची उत्तरे असतील असा एखादा मैत्र हवा असतो. अनेक वर्षापासून चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि रीतीरीवाजाच्या गुंत्यातून ती पूर्णपणे बाहेर आलेली नाही, बालपणापासून परक्याचे धन, काचेचे भांडे हे तिच्यावर बिंबवले गेलेले संस्कार, समाजाची भीती गेलेली नाही. स्पर्धात्मक जगात ती तीचं बाईपण, आईपण आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व टिकवून ठेवण्यासाठी आपलं शरीर आणि मन यांचा तोल सांभाळत अथक मेहनत घेत आहे. परिस्थिती कशीही असली तरी ती झगडते, हरणारी लढाई ती लढत नाही, कारण हरली तरी त्या अनुभवाने ती समृद्ध झालेली असते. याचा अर्थ ती स्वतन्त्र आहे असा नाही. सर्वच क्षेत्रात आपले सामर्थ्य सिद्ध करूनही स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचे स्वरूप वेगवेगळे आहे व ते लिंग भेदामुळे आहे. स्त्री हक्काविषयी जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या कमावत्या स्त्रीचे खाजगी जीवन, कौंटुबिक जीवन व सामाजिक जीवन पुरुषसत्ताक व्यवस्थेत नियंत्रित राहिल्यामुळे घरातल्या सत्ताधारी पुरुष व स्त्रियांकडून ते धर्माच्या, रूढीपरंपरा आणि सांस्कृतिक नितिमत्तेमधून अनेकवेळा दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ती काहीसी सत्ताहीन आणि परावलंबी होताना दिसते. गरिबीमुळे आणि शिक्षणाच्या अभावाने अनेक स्त्रियांना अन्न, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन शहरी भागात बदललेला असला तरी ग्रामीण भागात स्त्रियांच दुय्यमस्थान तसंच आहे. शहरी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले ‘स्व'त्व जपत असली तरी तिच्या आत्मसन्मानाला आव्हान मिळतेच. एखादी स्त्री जेव्हा आपल्या बुद्धीच्या स्वबळावर कर्तृत्व गाजवते तेव्हा तिच्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. पण यामुळे तीच कर्तृत्व शून्य ठरत नाही.
स्त्रीहक्क म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी न समजता दोघांनाही कामाची समान संधी मिळावी. स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांचा सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकिय दर्जा सुधारण्यासाठी व लिंगभेद न करता माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार.. ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे स्त्रियांना सबलीकरणाची मोठी संधी मिळाली. त्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांची स्वतःबद्दलची स्त्री म्हणून असलेली दुर्बल प्रतिमा बदलते आहे. त्यांच्यातील सुप्तगुण, कौशल्ये, क्षमता, वृद्धिंगत होत आहेत. त्यांमुळे त्या योग्य निर्णय घेणे, अत्यंत महत्वाच्या प्रश्नांवर माहितीच्या आधारे ठाम भूमिका घेणे त्यांना शक्य झाले आहे. ज्ञान, माहिती, दृष्टिकोन आणि कौशल्ये यांच्या आधारे त्यांचे जीवन जगणे सोपे झाले आहे. शालेय जीवनापासून महिला व मुलींचे कायदे ज्यात विवाहाचे वय, स्त्री पुरुष समानता, लिंग समभाव, घरगुती अत्याचार, त्यांचे मालकी हक्क या विषयी जाणीव जागृती केली जात आहे.
स्त्रियांविरुध्द होणाऱ्या सर्व प्रकारचा भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १८ डिसेबर १९७९ रोजी एक करारनामा केला जगातील १७४ देशानी त्याला अधिकृतपणे संमती दिली. स्त्रियांच्या पुनरुत्पादनाच्या हक्काला मान्यता देणारा हा एकमेव करारनामा आहे. यात स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखले जाणार नाही तसेच स्त्रीपुरुष समानतेचं तत्व व मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या आधारावर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, नागरी, राजकिय इत्यादी सर्व क्षेत्रात स्थान, मानसन्मान व ओळख मिळाली पाहिजे. त्यांना नागरिकत्वाचे हक्क मिळावेत, स्त्रीचे नागरिकत्व हे तिच्या पतीच्या मर्जीवर किंवा वैवाहिक दर्जावर अवलंबुन नसावेत तर याबाबतचा निर्णय तिने स्वतः घ्यावा. खेळ, मनोरंजन व सांस्कृतिकदृष्ट्या सर्व पातळ्यांवर स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा हक्क, आरोग्य व वैवाहीक स्थिति व कुटुंब कल्याणासाठी रोजगाराच्या संधी, वेतन, फायदे, सामाजिक सुरक्षितता मिळण्याचा हक्क आहे. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे व त्यांना आरोग्य, कुटुंबनियोजन, सामाजिक सुरक्षितता, शिक्षण व सहभागाचा त्याचप्रमाणे चांगल्या राहणीमानाचा हक्क मिळायला हवा. कायद्यासमोर समानतेचा, न्यायप्रक्रियेत समान वागणूकीचा, संचारस्वातंत्र्य व निवासाचे ठिकाण ठरविण्याचा अधिकार, विवाहाचा व कौंटुबिक नात्यासंदर्भातील हक्क यामध्ये इच्छेनुसार जोडीदार निवडणे, पालक म्हणून समानता, संपत्तीची मालकी व व्यवस्थापन या हक्कांबरोबरच मुलांची संख्या व त्यातील अंतर ठरविण्याचा हक्क असल्याचे सांगितले आहे.
अनेक वर्षापासून स्त्रियांचे आयुष्य हे अज्ञान,गैरसमज,अंधश्रध्दा पुरुषांवर अवलंबून असणं यात होरपळून निघत आहे. अशावेळी स्त्रीस्वातंत्र्य,स्त्रीसक्षमीकरण यांचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या गर्दीत तमाशा बघत बसण्यापेक्षा जगात काही बदलायचे असेल तर सुरुवात स्वत:पासून करावी. महात्मा गांधीनी म्ह्टल्याप्रमाणे ’Be the change, you want to see’ हे तत्व प्रत्येक स्त्रीन आणि तिच्या जवळच्या प्रत्येक पुरुषानं मनात बिंबवल तर बदल आपोआप घडतील आणि स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. बदल घडवण्यासाठी फक्त तशी विचारसरणी आणि दृष्टीकोन असला पाहिजे…
सौ.चंदाराणी माधव कुसेकर, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षिका
जिल्हा परिषद शाळा माणेरे ,ता.अंबरनाथ जिल्हा ठाणे
.jpg)




Post a Comment
0 Comments