ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (डीएलएलई) व साकेत ज्ञानपीठ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने साकेत ज्ञानपीठ कल्याण येथील भव्य प्रांगणात नुकतेच 'उड्डान फेस्टिवल' संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (डीएलएलई) या विभागाचे डायरेक्टर डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. कुणाल जाधव, डॉ. अनिल सिंह, साकेत ज्ञानपीठ कल्याण या संस्थेचे संस्थापक डॉ. विनोद तिवारी, प्राचार्य डॉ. संतोष रुकारी, सदस्य डॉ. नारायण फडके, डॉ. हीर बोलकानी इत्यादी विचारवंत आणि ३४ महाविद्यालयांचे सुमारे ७५० विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी पथनाट्य, पोवाडा, सर्जनशील लेखन, वक्तृत्व आणि पोस्टर मेकिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांसाठी तज्ञ परीक्षक म्हणून प्रा.शारदसुत सुनील म्हसकर, प्रा.प्रदिप सरवदे, डॉ. श्रीम. बॅनर्जी, डॉ. शुभम सोनवणे, भीमराव खेत्रे, रोहन टिल्लू, उत्कर्षा साने, विद्यानाथ सुर्वे, रमेश चांदणे, प्रदिप गोगटे, यज्ञेश दौंड, रामदास लांडगे यांनी स्पर्धांचे उत्तम परीक्षण केले. क्षेत्र समन्वयक डॉ.बॅनर्जी, डॉ.नितीन गाढे, डॉ.सुनील नांबियार, डॉ.दिलीप आहुजा यांचे विशेष योगदान लाभले. याप्रसंगी डायरेक्टर डॉ. बळीराम गायकवाड यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना म्हटले की, “मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (डीएलएलई) या विभागातर्फे 'उड्डान फेस्टिवल' च्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण ३८० महाविद्यालयांमध्ये ज्या विविध स्पर्धा घेत आहोत त्यात सुमारे ९००० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करणे, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास, संघकार्य, सादरीकरण कौशल्ये, लेखन क्षमता, नेतृत्व कौशल्ये यांसारखी रोजगारक्षम कौशल्ये वाढवणे ही महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
'उड्डान फेस्टिवल' हे तरुणाईच्या विचारशक्तीचा, सामाजिक जाणिवेचा आणि कला - कौशल्याचा उत्सवच आहे ! आजचे हे व्यासपीठ तुम्हाला भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवण्याचा पहिला टप्पा आहे. यातून तुमच्यासारख्या युवापिढीला उद्याचा समर्थ व सशक्त भारत घडविण्याची सकारात्मक प्रेरणा व ऊर्जा मिळत राहिल, वैचारिक क्रांती घडवून आणण्याची ताकद मिळू शकेल . यासाठीच आपण आपल्या सर्वांमध्ये विश्वगुरू बनण्याची जी दिव्य क्षमता दडून बसली आहे, ती ओळखून महान कार्य करत राहणे व देश घडवत राहणे ... हीच आजच्या काळाची गरज आहे.”
यावेळी संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांनी प्रा. कुणाल जाधव, डॉ. शुभम सोनवणे, प्रशांत कांबळे, किरण पाटील, मयूर नाईक, आदित्य पवार ही संपूर्ण डीएलएलई विभागाची टीम आणि साकेत ज्ञानपीठ कल्याण यांचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांचे तसेच उड्डाण महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक, जाणकार व तज्ञ परीक्षक या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करून विजेत्या युवा स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचे विशेष कौतुक केले.
- शब्दांकन – प्रा. शारदासुत सुनील म्हसकर, कल्याण
.jpg)


Post a Comment
0 Comments